कोरोनापासून सुरक्षेसाठी जिल्ह्यातील ७० बसेसची होणार कोटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:34 AM2021-08-14T04:34:09+5:302021-08-14T04:34:09+5:30
कपिल केकत गोंदिया : मागील वर्षभरापासून अवघ्या जगाला कोरोनाने हेलावून सोडले आहे. देशातही कोरोनाचा कहर सुरूच असून दुसऱ्या नंतर ...
कपिल केकत
गोंदिया : मागील वर्षभरापासून अवघ्या जगाला कोरोनाने हेलावून सोडले आहे. देशातही कोरोनाचा कहर सुरूच असून दुसऱ्या नंतर आता तिसऱ्या लाटेबाबत बोलले जात आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे नागरिकांनी आता प्रवास टाळण्यास सुरुवात केली असून गरज पडल्यास आपल्याच वाहनाने प्रवासाला प्राधान्य देत आहेत. परिणामी संपूर्ण खबरदारी व सॅनिटायजेशन करूनही नागरिक एसटीला टाळत असल्याचे दिसत आहे. मात्र आता राज्य रस्ते परिवहन महामंडळाने एसटीचे सॅनिटायजेशन न करता एसटीला कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष प्रकारचे हे कोटिंग असून यापासून कोरोनाचा ससंर्ग टाळता येणार आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील गोंदिया आगारातील ४५ तर तिरोडा आगारातील २५ बसेसची कोटिंग केली जाणार आहे.
-------------------------
जिल्ह्यातील आगार आणि बसेस
आगार बसेस
गोंदिया ८१
तिरोडा ४२
----------------------------
कोटिंगसाठी आगारात येणार पथक
राज्य रस्ते परिवहन महामंडळाने राज्यातील सर्वच एसटींचे कोटिंग करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार गोंदिया व तिरोडा आगाराला पत्र आले आहे. यात आगारांकडून भंडारा येथील विभागीय कार्यालयाने वाहनांची यादी मागवून घेतली आहे. तर बसेसचे कोटिंग करण्यासाठी विशेष पथक आगारात येणार आहे. हे पथक कधी येणार हे अद्याप कळले नसून पथक आल्यानंतर ते बसेसची कोटिंग आगारातच करणार आहेत.
-----------------------------
विभागीय कार्यालयाकडूनच सॅनिटायजरचा पुरवठा
आतापर्यंत प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने महामंडळाकडून बसेसला फेरी मारून आल्यानंतर लगेच सॅनिटायजेशन करण्याचे आदेश होते. त्यानुसार, आगारातील बसेसचे सॅनिटायजेशन केले जात होते व यासाठी भंडारा येथील विभागीय कार्यालयाकडूनच आगारांना सॅनिटायजेशनचा पुरवठा केला जात होता. आता बसेसचे कोटिंग केले जाणार असल्याने वारंवार सॅनिटायजेशनची भानगडच संपणार आहे.
------------------------------
बसेसचे कोटिंग करण्याबाबत आगाराला पत्र आले असून बसेसची यादी विभागीय कार्यालयाला पाठविली आहे. कोटिंगसाठी पथक आगारातच येणार असून कधी येणार याबाबत अद्याप काहीच माहिती नाही. पथक आल्यावर त्यांच्याकडून बसेसचे कोटिंग करवून घेतले जाईल.
- पंकज दांडगे
आगार प्रमुख, तिरोडा.