७०० प्रवाशांनी दोन तास रोखली वैनगंगा एक्स्प्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:30 PM2018-12-16T23:30:01+5:302018-12-16T23:32:22+5:30
आंध्र प्रदेशात जाणाऱ्या मजुरांची संख्या बरीच आहे. कोरबावरून बेंगळुरूकडे जाणाऱ्या वैनगंगा एक्स्प्रेसमध्ये गर्दी झाल्याने गोंदिया रेल्वेस्थानकावर तब्बल दोन तास ही गाडी प्रवाशांनी रोखून धरली. हा प्रकार रविवारी (दि.१६) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आंध्र प्रदेशात जाणाऱ्या मजुरांची संख्या बरीच आहे. कोरबावरून बेंगळुरूकडे जाणाऱ्या वैनगंगा एक्स्प्रेसमध्ये गर्दी झाल्याने गोंदिया रेल्वेस्थानकावर तब्बल दोन तास ही गाडी प्रवाशांनी रोखून धरली. हा प्रकार रविवारी (दि.१६) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला.
रेल्वे प्रशासनाने ७०० रेल्वे प्रवाश्यांना पुढे जाण्यासाठी गोंदिया बल्लारशा गाडीत व्यवस्था केली. गाडी क्र. १२२५२ वैनगंगा एक्स्प्रेस कोरबावरून बेंगळुरूला जात असताना रविवारी (दि.१६) दुपारी ३ वाजता गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर आली. या रेल्वे गाडीतील आरक्षीत डब्ब्यामध्ये २ ते तीन हजार मजूर बसले होते. त्या मजुरांना दंड आकारून त्यांना डब्ब्यात बसू दिले. परंतु गर्दी अधिक असल्यामुळे त्या गाडीतील आरक्षीत डब्यांमधील आरक्षण केलेल्या प्रवाश्यांना अडचण झाली. यावरुन गोंधळ उडाला. गोंदिया रेल्वे स्थानक येण्यापूर्वीच प्रवाश्यांमध्ये हमरीतुमरी होऊ लागली. ज्यांचे तिकीट कन्फर्म झाले ते प्रवाशी दुसºया रेल्वे प्रवाश्यांना आपल्या सीटवर बसू देण्यास तयार नव्हते. त्यामुळे सीट जवळील खुल्या जागेत मजूर बसले. परंतु गर्दी एवढी झाली की आरक्षण केलेल्या लोकांना पाय ठेवायला जागा नव्हती. आरक्षीत डब्ब्यात बसलेल्या मजुरांकडून रेल्वे तिकीट निरीक्षकांनी दंड आकारला. त्यामुळे मजुरांना त्याच ठिकाणी राहता आले. परंतु ती गोष्ट आरक्षण केलेल्या लोकांना मान्य नव्हती.
आरक्षण केलेले प्रवाशी व सामान्य प्रवाशी यात धावत्या गाडीत शाब्दीक चकमक झाली. अखेर गोंदिया स्थानकावर दुपारी ३ वाजता पोहचलेली वैनगंगा एक्सप्रेस तब्बल दोन तास रोखून धरली. गोंदिया रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने ७०० मजुरांना खाली उतरविण्यात आले. त्या मजुरांना गोंदिया-बल्लारशा रेल्वे गाडीने जाण्याची सोय रेल्वे विभागाने करुन दिली.
वैनगंगा एक्सप्रेसला सामान्य बोगी एकच असल्यामुळे ही तारांबळ उडाल्याचे रेल्वे प्रवाश्यांचे म्हणणे आहे. परंतु मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात आल्यामुळे त्यांची तारांबळ उडाल्याचे रेल्वे विभागाचे म्हणणे आहे. छत्तीसगडच्या राजनांदगाव, रायपूर येथील हजारो मजूर त्या गाडीतून प्रवास करीत होते. सायंकाळी ५ वाजता दरम्यान वैनगंगा एक्सप्रेसने पुढच्या प्रवासासाठी रवाना झाल्याची माहिती रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार चक्रे यांनी दिली.