७ हजार कुटुंबावर उपासमारीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 09:09 PM2019-04-28T21:09:32+5:302019-04-28T21:10:08+5:30
तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून यावर जवळपास ७ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा वाढत्या तापमानामुळे तलाव, बोड्या कोरड्या पडल्या असून वाढत्या तापमानामुळे तलावातील मासे मृत्यूमुखी पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून यावर जवळपास ७ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा वाढत्या तापमानामुळे तलाव, बोड्या कोरड्या पडल्या असून वाढत्या तापमानामुळे तलावातील मासे मृत्यूमुखी पडत आहे.त्यामुळे कोट्यवधीे रुपयांचा व्यवसाय संकटात आला असून यावर अवलंबून असणाऱ्या ७ हजारावर कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे.
जिल्ह्यात माजी मालगुजारी (मामा) तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या तलावांचा उपयोग मासेमारी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे हजारो कुटुंबाना रोजगार मिळतो. जिल्ह्यात जि.प.च्या मालकीचे एकूण ६ हजार ८३९ लघु तलाव आहेत. तर २०० हेक्टर क्षेत्राचे १० आणि २०० हेक्टरपेक्षा कमी क्षमतेचे ५६ तलाव आहेत. १३३ नोदंणीकृत मत्स्यपालन संस्था आहेत. जि.प.व सिंचन विभागातर्फे तलावांचा लिलाव करुन अथवा लिजवर तलाव मत्स्यपालन संस्थेला दिले जाते. यामुळे शासनाला सुध्दा दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळतो. जिल्ह्यात पावसाळ्यात सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडतो. तर तलावांची संख्या अधिक असल्याने या दोन्ही गोष्टी मत्स्यपालनासाठी अनुकुल आहेत.या व्यवसायामुळे हजारो कुटुंबाना रोजगार मिळतो.मात्र मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ९५० मि.मी.पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्प आणि तलावांमध्ये मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा तापमानात सुध्दा प्रचंड वाढ झाली असल्याने पाण्याचे लवकर बाष्पीभवन होत असल्याने तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून तलाव कोरडे पडत आहे. तलावातील पाणी कमी आणि वाढत्या उष्णतामानामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडत आहे. त्यामुळे मत्स्यपालन संस्थांना सुध्दा आर्थिक फटका बसला असून यावर आधारीत कुटुंंब देखील संकटात आल्याचे चित्र आहे.
तलावांच्या खोलीकरणाचा अभाव
शासनाने जलयुक्त शिवारच्या धर्तीवर गाळमुक्त तलाव योजना अंमलात आणली. मात्र या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्याने जिल्ह्यातील शेकडो तलावातील गाळाची समस्या कायम आहे. परिणामी तलावांच्या सिंचन क्षमतेत सुध्दा घट होत आहे. तलावांचे खोलीकरण झाले असते तर तलावात काही प्रमाणात पाणी साचून राहिले असते त्याची मत्स्यपालन संस्था आणि शेतकऱ्यांना सुध्दा मदत झाली असती. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.
तलावांवर वाढले अतिक्रमण
जि.प.आणि सिंचन विभागाच्या मालकीचे जिल्ह्यात सहा हजारावर तलाव आहेत. मात्र यांच्या देखभाल दुरूस्तीकडे या दोन्ही विभागांचे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळे तलाव लगतच्या शेतकºयांनी तलावावर अतिक्रमण करुन तलावाचे क्षेत्र कमी केले आहे. परिणामी तलावाचे सिंचन क्षेत्र कमी होत असून याचा पाहिेजे तसा लाभ होत नसल्याचे चित्र आहे.
भूजल पातळीवर परिणाम
तलावातील गाळाचा उपसा न केल्याने सिंचन क्षमतेत घट होत आहे.तर उन्हाळ्याच्या दिवसात लवकरच तलाव कोरडे पडत असल्याने त्याचा भूजल पातळीवर सुध्दा परिणाम होत आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.