जिल्ह्यात ७१११ घरांची पडझड
By admin | Published: August 10, 2016 12:05 AM2016-08-10T00:05:00+5:302016-08-10T00:05:00+5:30
नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा मे महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत आलेल्या संकटात जिल्ह्यातील ७ हजार १११ घरांची पडझड झाली.
दोन महिन्यातील नैसर्गिक आपत्ती : पाच व्यक्तींचा तर ५८ जनावरांचा घेतला बळी
नरेश रहिले गोंदिया
नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा मे महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत आलेल्या संकटात जिल्ह्यातील ७ हजार १११ घरांची पडझड झाली. वीज पडून, गोठा पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या ५ असून ५८ जनावरांनाही प्राणास मुकावे लागले. त्यात दुधाळू जनावरे ३२ असून ओढकाम करणाऱ्या २६ जनावरांचा समावेश आहे. या नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ७५ लाख २७ हजार २०० रुपयांची मदत नागरिकांना करण्यात आली.
या आपत्तीदरम्यान गोंदिया तालुक्यात एका व्यक्तीचा आणि एका जनावराचा मृत्यू झाला. तसेच ९० घरे जमीनदोस्त झाली आहेत. ३ हजार ५७२ घरे अंशत पडली. तिरोडा तालुक्यात पाच जनावरांचा मृत्यू झाला तर ६९ घरे जमीनदोस्त झाली. १ हजार ७३ घरे अंशत: पडली. याशिवाय जनावरांचे १०७ गोठे पडले.
गोरेगाव तालुक्यात पाच जनावरांचा मृत्यू झाला तर ६५३ घरे जमीनदोस्त झाली. तसेच ६७ गोठे जमीनदोस्त झाले. अर्जुनी मोरगाव तालुक्यात तीन व्यक्तीचा मृत्यू झाला, ११ जनावरांचा मृत्यू झाला १ हजार ८९ घरे जमीनदोस्त झाली. एक गोठाही पडला. देवरी तालुक्यात २९ जनावरांचा मृत्यू झाला तर ३७ घरे जमीनदोस्त झाली. तर ७ गोठेही पडले. आमगाव तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, पाच जनावरे ठार, ४९ घरे जमीनदोस्त झाली. सालेकसा तालुक्यात ३७९ घरे जमीनदोस्त झाली. सडक अर्जुनी तालुक्यात दोन जनावरांचा मृत्यू होऊन ५७ घरे जमीनदोस्त झाली. अंशत: ४३ घरे आणि ६५ गोठे पडले.
जिल्ह्यात दोन महिन्यातील नैसर्गिक आपत्तीत पाच व्यक्तींचा बळी गेला. ५८ जनावरे ठार झाली. २ हजार ४२३ घरे जमीनदोस्त, ४ हजार ६८८ घरांचे अंशत: नुकसान झाले. २४७ गोठे पडले आहेत.
जिल्ह्यात ९ आॅगस्टपर्यंत सरासरी ८००.०१ मिमी पाऊस पडायला पाहीजे. परंतु यावर्षी ६७१.६ मिमी पाऊस पडला. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ५८६.२ मिमी पाऊस पडला होता. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी ८५ मिमी जास्त पाऊस पडला आहे. परंतु सरासरी अपेक्षित पावसापेक्षा १२९ मिमी पाऊस कमी झाला आहे.
शासनाकडे तीन कोटींची मागणी
नैसर्गिक संकटात सापडलेल्या जिल्हावासियांना जिल्हा प्रशासनातर्फे आतापर्यंत ७५ लाख २७ हजार २०० रूपयांची मदत करण्यात आली. १० लाख १७ हजार ८०० रूपये जिल्हा प्रशासनाकडे शिल्लक आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्याला आणखी तीन कोटीची गरज असल्याने वाढीव रकमेची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.