७१३० बालके कुपोषित
By admin | Published: April 12, 2015 01:33 AM2015-04-12T01:33:28+5:302015-04-12T01:33:28+5:30
कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.
नरेश रहिले गोंदिया
कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र गोंदिया जिल्ह्यातील कुपोषण आजही कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यात आजच्या स्थितीत ७ हजार १३० बालके कुपोषित आहेत. कुपोषणमुक्तीसाठी शासनाने सुरू केलेले राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान जिल्ह्यात अपयशी ठरले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गेल्या चार वर्षातील कुपोषित बालकांची आकडेवारी पाहिल्यास कुपोषणाचे प्रमाण ज्या पद्धतीने कमी होणे अपेक्षित होते ते झालेले दिसत नाही. सन मार्च २०१२ मध्ये कमी वजनाची १२ हजार ९ बालके तर अतितिव्र कमी वजनाची १९०५ बालके होती. मार्च २०१३ मध्ये कुपोषणाचे प्रमाण बरेच कमी झाले होते. त्या वर्षी कमी वजनाची ६०१४ बालके तर अतितिव्र कमी वजनाची ११७५ बालके होती. मार्च २०१४ मध्ये पुन्हा कुपोषणाचे प्रमाण वाढून कमी वजनाची ८३३२ बालके तर अतितिव्र कमी वजनाची १७३२ बालके आढळली. तर फेब्रुवारी २०१५ या महिन्यात कमी वजनाची ५९५१ बालके आणि अतितिव्र कमी वजनाची ११७९ बालके आढळली आहेत.
शासनाने राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग यांच्यावर जबाबदारी सोपविली. अंगणवाडी सेविकांपासून तर जिल्हा परिषदेच्या बालकल्याण व आरोग्य विभागातील बड्या अधिकाऱ्यांना कुपोषण कमी करण्याची जबाबदारी दिलेली आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यातील अधिकारी कुपोषणाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील कुपोषणात अपेक्षित घट झालेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत कुपोषणाचे सर्वाधिक प्रमाण गोंदिया व अर्जुनी-मोरगाव या दोन तालुक्यात आहे.