७२ लाखांचे सोने गायब
By admin | Published: January 7, 2017 02:07 AM2017-01-07T02:07:51+5:302017-01-07T02:07:51+5:30
गोंदिया रेल्वे स्थानकातून रायपूरला जाण्यासाठी इंटरसिटी एक्सप्रेसच्या बोगी एस-६ मधील प्रवासी भरत दुलीचंद जैन (३८) रा. मुंबई
दुसऱ्या आरोपींच्या शोधात पोलीस : सोलापूरच्या तीन आरोपींकडून काहीही मिळाले नाही
गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकातून रायपूरला जाण्यासाठी इंटरसिटी एक्सप्रेसच्या बोगी एस-६ मधील प्रवासी भरत दुलीचंद जैन (३८) रा. मुंबई यांच्या ७२ लाख रूपये किमतीच्या झालेल्या सोन्याच्या चोरीचा अद्याप काहीही सुगावा लागला नाही.
२० आॅक्टोबरला दुपारी झालेल्या या चोरीच्या संशयावरून रेल्वे पोलिसांनी तीन व्यक्तींना पकडले. परंतु त्या व्यक्तींजवळून न सोने मिळाले न कोणतीही रोख रक्कम. त्यामुळे सदर तिघांना सोडून देण्याची पाळी पोलिसांवर आली. शेवटी हे सोने कुठे गायब झाले, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे.
१९ आॅक्टोबरला मुंबईवरून सोने विक्रीसाठी गोंदियात आलेल्या भरत यांनी त्याच दिवशी बालाघाटला जावून सोने व्यापाऱ्यांची भेट घेतली व गोंदियाला परत आले.
दुसऱ्या दिवशी २० आॅक्टोबरला ते रायपूरला जाण्यासाठी निघाले. परंतु जेव्हा ते गोंदिया रेल्वे स्थानकावरून इंटरसिटी एक्सप्रेच्या बोगी एस-६ मध्ये बसले, ट्रेन सुटताच ते लघुशंकेसाठी गेले. या दरम्यान त्यांच्या बॅगमधून काही लोकांनी सोने गायब केले. या संदर्भात गोंदिया रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला व तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाला तहसीलच्या तीन व्यक्तींना वेगवेगळ्या दिवसी ताब्यात घेतले. यात करमाला तालुक्याच्या सालसे गावातील रहिवासी पप्पू उर्फ शरद रामा काले (२८), जेऊर येथील रहिवासी रविंद्र बलभीम भुजरतकर (६५) व सालसे येथील रहिवासी हर्षद उर्फ चंद्रकांत रामा काले (३२) यांचा समावेश आहे. त्यांना नागपूर येथील रेल्वे न्यायालयात सादर केल्यानंतर सोने जप्तीसाठी त्यांना त्यांच्या गावी पोलिसांनी नेले. परंतु त्यांच्याजवळून सोने जप्त होवू शकले नाही. त्यामुळे त्यांना सोडणे भाग पडले.
आता पुन्हा त्याच गावातील काही आरोपींना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. त्या आरोपींकडून पोलीस सोने जप्त करू शकले नाही तर त्यांना सोडावे लागू शकते. त्यामुळे खूप सतर्कतेने पोलिसांना आता आरोपी पकडावे लागतील. (प्रतिनिधी)
करमाला येथीलच रहिवाशांवर संशय का?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत जैन यांच्यासह त्यांचा एक सोबत्याचा कधीतरी वाद झाला होता. तो सोबती करमाला तालुक्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी जेव्हा करमाला येथील रहिवाशांबाबत चौकशी केली तर फिर्यादीने सांगितले की, एकदा त्यांच्यासह वाद झाला होता. तो व्यक्ती भरत यांच्यासह गोंदियालासुद्धा आलेला आहे. त्यामुळे याच तालुक्यातील रहिवाशांचा हात या चोरीत असावा, असा पोलिसांना संशय आहे. या सर्व बाबींवर पोलीस कार्य करीत आहे की, आरोपींची संख्या एकापेक्षा अधिक आहे व त्यांना आधीच ही बाब माहीत होती की भरत कुठून व कसे जातो. याच आधारावर त्यांनी आपला षडयंत्र रचून चोरीची घटना घडविली. रेल्वेचे सहायक पोलीस निरीक्षक संजयसिंह वारंवार पुणे व सोलापूरच्या चकरा याच चोरीच्या तपासकार्यासाठी करतात.