७३८४ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार
By कपिल केकत | Published: May 17, 2023 11:47 PM2023-05-17T23:47:06+5:302023-05-17T23:47:19+5:30
ग्रामपंचायत पोटनिवडणूक, नऊ गावांत गुरूवारी मतदान
कपिल केकत -गोंदिया: ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा रणसंग्राम आता शेवटच्या टप्प्यात आला असून जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायत मधील रिक्त जागांसाठी गुरुवारी (दि.१८) मतदान घेण्यात येणार आहे. यामध्ये एकूण ७३८४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील आठ पैकी फक्त चारच तालुक्यांत ही पोटनिवडणूक होत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायत मधील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायत मधील २९ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. मात्र निवडणूक कार्यक्रमांतर्गत १४ जागांसाठी फक्त एकच अर्ज आल्याने त्या अविरोध झाल्या. तर तीन जागांसाठी एकच अर्ज आला व एका जागेसाठी आलेला एकमात्र अर्ज अवैध ठरल्याने एकूण चार जागांसाठी निवडणूक टळली आहे. अशात आता नऊ ग्रामपंचायतमध्ये ११ जागांसाठी ही पोटनिवडणूक घेतली जात असून त्यासाठी गुरुवारी (दि.१८) मतदान घेतले जाणार आहे.
यात सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोकणा-जमी येथे ४८६ तर कोदामेडी येथे ४९९ मतदार, गोंदिया तालुक्यातील ग्राम परसवाडा येथे ५४१ मतदार, कोचेवाही येथे ६४१ मतदार, खमारी येथे बुथ क्रमांक-१ येथे ७९३ तर बुथ क्रमांक -२ येथे ८६४ मतदार, सावरी येथे बुथ क्रमांक-१ येथे ८३२ तर बुथ क्रमांक- २ येथे ७४७ मतदार, कारंजा येथे ६०६ मतदार, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम केशोरी येथे ६८७ मतदार तर देवरी तालुक्यातील ग्राम गोटाबोडी येथे ६८८ मतदार असे एकूण ७३८४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. गुरुवारी होत असलेली मतदान प्रक्रिया त्या-त्या गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये होणार आहे.
खमारी व सावरीसाठीच दोन बुथ
- जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतसाठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेत फक्त गोंदिया तालुक्यातील ग्राम खमारी व सावरीसाठीच दोन बुथ ठेवण्यात आले आहेत. यात ग्राम खमारी येथील बुथ क्रमांक-१ वर ३६५ परुष व ४२८ महिला असे एकूण ७९३ मतदार तसेच बुथ क्रमांक -२ वर ४१६ पुरुष व ४४८ महिला असे एकूण ८६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर ग्राम सावरी येथे बुथ क्रमांक -१ वर ४२२ पुरुष व ४१० महिला असे एकूण ८३२ मतदार तसेच बुथ क्रमांक-२ वर ३७१ पुरुष व ३७६ महिला असे एकूण ७४७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
शुक्रवारी मतमोजणी व निकाल
- गुरुवारी घेण्यात येणाऱ्या या मतदान प्रक्रियेची मतमोजणी व निकाल शुक्रवारी जाहीर केला जाणार आहे. निवडणूक होत असलेल्या गावांची मतमोजणी न निकाल त्या-त्या तहसील कार्यालयांमध्ये होणार आहे. अशात आता सर्वांच्या नजरा मतदान व निकालाकडे लागल्या आहेत.
तालुका- ग्रामपंचायत- पुरुष- महिला - एकूण
गोंदिया - परसवाडा- २८१-२६०-५४१
कोचेवाही- ३१६-३२५-६४१
खमारी- ७८१-८७६-१६५७
सावरी- ७९३-७८६-१५८३
कारंजा- २८६-३२०-६०६
अर्जुनी-मोरगाव- ३४०-३४७-६८७
सडक-अर्जुनी- कोकणा-जमी.- ००-००-४८६
कोदामेडी- ००-००-४९९
देवरी- गोटाबोडी- ००-००-६८८