जिल्ह्यातील ७४ गावे जलसमृद्धीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 10:11 PM2017-09-12T22:11:09+5:302017-09-12T22:11:09+5:30

जलसंवर्धनाच्या कामातून कायमस्वरुपी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे.

74 villages on the way to water supply | जिल्ह्यातील ७४ गावे जलसमृद्धीच्या मार्गावर

जिल्ह्यातील ७४ गावे जलसमृद्धीच्या मार्गावर

Next
ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान : सडक-अर्जुनी तालुक्यातील तीन गावांचे काम प्रगतीपथावर

देवानंद शहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :जलसंवर्धनाच्या कामातून कायमस्वरुपी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचे पहिल्याच वर्षी सकारात्मक परिणाम दिसून आले. जिल्ह्यात २०१६-१७ या कालावधीत झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे जिल्ह्यातील ७४ गावे जलसमृध्दी होण्याच्या मार्गावर आहेत.
शासनाची महत्त्वपूर्ण व महत्वाकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात कोट्यवधींची कामे करण्यात आली. या अभियानांतर्गत सन २०१६-१७ मध्ये गावांना जलसमृद्ध करण्यासाठी जिल्ह्यातील एकूण ७७ गावांची निवड करण्यात आली होती. यापैकी ७४ गावे ९० ते १०० टक्के जलसमृद्ध झाली आहेत. तर उर्वरित तीन गावांमध्ये ५० ते ८० टक्क्यांपर्यंत कामे पूर्ण झाल्याची माहिती आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गोंदिया तालुक्यातील १० गावांची निवड करण्यात आली होती. यातील सर्व १० ही गावे जलसमृद्ध झाली आहेत. यात फुलचूर, चंगेरा, फतेपूर, घिवारी, सोनबिहरी, दासगाव खुर्द, तेढवा, धामनगाव व दतोरा या गावांचा समावेश आहे. तर गोरेगाव तालुक्यातील ११ गावांची निवड करण्यात आली होती. त्या गावांची भूजल पातळी वाढविण्यात यश आले आहे. यात पाथरी, सोनेगाव, सिलेगाव, बघोली, सोनी, कालीमाटी,आंबेतलाव, दवडीपार, नोनीटोला, चांदीटोला या गावांचा समावेश आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसमृद्धीसाठी तिरोडा तालुक्यातील ९ गावांची निवड झालेली होती. यात सोनेगाव, नहरटोला, मुंडीपार, नवेगाव, करटी बु., पालडोंगरी, मरारटोला, चिखली व लोणार या गावांचा समावेश आहे. सर्व जलसमृद्ध झाल्याचे सांगण्यात आले आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातही निवडलेली ९ गावे जलसमृद्ध झाली आहेत. यात सावरटोला, करडगाव-तिडका, बोळदे-करड, परसोडी, गुडरी, डोंगरगाव-कवठा, भिवखिडकी, पिंपळगाव, बोंडगावदेवी या गावांचा समावेश आहे.
आमगाव तालुक्यातही ९ गावांची निवड करण्यात आली होती. यात बघेडा, गोसाईटोला, जांभुळटोला, सरकारटोला, सुपलीपार, भजियापार, डोंगरगाव, जांभखरी, बोरकन्हार या गावांचा समावेश असून ते जलसमृद्ध झाली आहेत. देवरी तालुक्यातील निवड झालेल्या ११ गावांमध्ये कोसबी खुर्द, परसोडी, आलेवाडा, कडीकसा, फुटाना, चिल्हाटी, धमदीटोला, घोनाडी, म्हैसुली, बाळापूर, धवलखेडी या गावांचा समावेश असून ते जलसमृद्ध झाले आहेत. तसेच सालेकसा तालुक्यातील निवड झालेले मुरकूडोह, दंडारी, पांढरवाणी, कलरभट्टी, मानागड, कोसमतरा, हलबीटोला व गांधीटोला या गावांचा समावेश आहे. या अभियानांतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यात गोपालटोली, घटेगाव, पुरकाबोडी, कनेरी, सडक-अर्जुनी, मालीजुंगा, मोगर्रा, गोंगले, मुरपार व पळसगाव या गावांची निवड करण्यात आली होती.
यापैकी गोंगले, मुरपार व पळगाव ही तीन गावे वॉटर न्युट्रल झालेली नाहीत. यापैकी एका गावात ८० ते ९० टक्के व दोन गावांत ५० ते ८० टक्के कामे झाली आहेत.
२०.५१४ टीसीएम जलसाठा
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात एकूण दोन हजार ६६६ कामे करायची होती. यापैकी दोन हजार ४८६ कामे पूर्ण झाली असून १८० कामे सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहेत. यात कृषी विभागाच्या एक हजार ८०६ कामांपैकी एक हजार ६९४ कामे पूर्ण झाली असून ११२ कामे प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत झालेल्या कामांवर ३२.५१ कोटी रूपये खर्च झालेले असून पूर्ण झालेल्या कामांमुळे जिल्ह्यात २०.५१४ टीसीएम जलसाठा निर्माण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

Web Title: 74 villages on the way to water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.