बार-दारूदुकान बंदीमुळे ७५ टक्के महसूल बुडणार
By admin | Published: April 5, 2017 12:57 AM2017-04-05T00:57:14+5:302017-04-05T00:57:14+5:30
जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंतची दारू दुकाने आणि बारवर सर्वोच्च न्यायालयाच्या
सर्वाधिक फटका गोंदियात : १७८ दुकाने-बारला लागले सील
गोंदिया : जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंतची दारू दुकाने आणि बारवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये १ एप्रिलपासून बंदी घातल्यानंतर जिल्ह्यात १७८ बार व मद्यविक्रीच्या दुकानांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील ठोकले. त्यांचे परवाने रद्द करून हजारो लिटर मद्यसाठाही जप्त करण्यात आला. ५०० मीटरच्या नियमानुसारच पुढे परवान्यांचे नुतनीकरण केले जाणार असल्यामुळे काही काळासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आतापर्यंत मिळणाऱ्या महसुलाच्या तुलनेत ७५ टक्के महसूल बुडणार आहे.
दि.३१ मार्चच्या संध्याकाळी वाईन शॉपसोबत बिअर बारलाही हा नियम लागू राहील असा आदेश निघाल्यानंतर बंदीच्या कक्षेत येणाऱ्या सर्व बार आणि शॉपला सील लावण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सतत दोन दिवस सुरू होते. दुकाने आणि बार सील करताना तिथे असणारा मद्यसाठा जप्त करून आणि स्टॉक रजिस्टर व लायसन्स ताब्यात घेण्यात आले.
हा मद्यसाठा परवानाधारक बार किंवा दुकानांना दिला जाणार आहे. बहुतांश दुकानदारांना ३१ मार्चनंतर आपले दुकान बंद होणार याची कल्पना असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त मद्यसाठा नव्हता, असे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले.
ज्या दुकाने किंवा बारला सील केले त्यांना महामार्गापासून ५०० मीटरपेक्षा लांब अंतरावर आपले दुकान किंवा बार स्थानांतरित करताना स्थानांतरण शुल्क घेतले जाणार नाही. मात्र इतर सर्व प्रक्रिया त्यांना नवीन परवान्याप्रमाणे करावी लागणार आहे. त्यामुळे किमान वर्षभर मद्यप्रेमींची अडचण होईल. (जिल्हा प्रतिनिधी)
- पुन्हा परवान्यासाठी मोठी कसरत
रद्द करण्यात आलेल्या परवानाधारकांना ५०० मीटरचा नियम पाळून परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण ही दुकाने किंवा बार यांना मुख्य मार्ग सोडून नागरी वस्त्यांमध्ये जागा शोधावी लागणार आहे. भर मार्केट वस्तीमधील जागा मिळालेच असे नाही. मिळाली तरी ती परवडणारी नसेल. त्यामुळे नागरी वस्तीजवळ दुकान लावण्यासाठी त्या भागातील नागरिकांकडून होणाऱ्या संभावित विरोधाचा सामना त्यांना करावा लागणार आहे.
अवैध मद्यविक्रीला येत आहे उधाण
दुकानांमधील किंवा बारमधील मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केला आहे. मात्र त्यापूर्वीच काही विक्रेत्यांनी स्टॉक रजिस्टरवर विक्री झाल्याचे दाखवून दारूच्या पेट्यांची गुप्त ठिकाणी विल्हेवाट लावली. आता त्या दारूच्या बाटल्या अव्वाच्या सव्वा दराने विक्री करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस त्या विक्रेत्यांवर कारवाई करीत आहेत.