दोन वर्षात ७५५ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:10 PM2019-07-08T22:10:56+5:302019-07-08T22:11:11+5:30

नक्षलग्रस्त व आदिवासी गोंदिया जिल्ह्यातील बालमृत्यूला नियंत्रणात आणण्यात गोंदिया जिल्ह्याचा आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. मागील दोन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ७५५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील ६९३ बालके ही वर्षभराच्या आतच मृत्यू पावली आहेत.

755 deaths in two years | दोन वर्षात ७५५ बालकांचा मृत्यू

दोन वर्षात ७५५ बालकांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देएक वर्षाच्या आतील ६९३ बालके : बालमृत्यू थांबता थांबेना

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नक्षलग्रस्त व आदिवासी गोंदिया जिल्ह्यातील बालमृत्यूला नियंत्रणात आणण्यात गोंदिया जिल्ह्याचा आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. मागील दोन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ७५५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील ६९३ बालके ही वर्षभराच्या आतच मृत्यू पावली आहेत.
शासन मातामृत्यू व बालमृत्यूची संख्या शुन्यावर आणण्यासाठी विविध योजना अमंलात आणत आहे. परंतु या योजनांच्या अमंलबजावणीत कुचराही होत असल्यामुळे मातामृत्यू व बालमृत्यूचे तांडव सुरूच आहे. गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील जनता आरोग्यासंदर्भात अत्यंत उदासिन आहे. गर्भवती किंवा बाळंतीन यांच्याकडे विशेष लक्ष दिले जात नसल्यामुळे गोंदिया जिल्ह्याचा बालमृत्यूचा आकड्यात दरवर्षी वाढ होत आहे.
मागील दोन वर्षातील बालमृत्यूचा आढावा घेतला असता सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ०-१ वर्षातील ३९५ बालके तर १ ते ५ वर्षातील १९ अशा ४१४ बालकांचा मृत्यू झाला आहे. सन २०१८-१९ या वर्षातील बालमृत्यूची आकडेवारी कमी झाली आहे. वर्षात ०-१ वर्षातील २९८ बालके तर १ ते ५ वर्षातील ४३ अश्या ३४१ बालकांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन वर्षात ७५५ बालकांचा मृत्यू झाला आहे. उपकेंद्रापासून जिल्हा रूग्णालयापर्यंत रूग्णांच्या सेवेसाठी यंत्रणा जरी असली तरी याच यंत्रणेच्या अनागोंदी कारभारामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. महिला गर्भवती झाल्यापासून तिच्या प्रसूती होऊन पाच वर्षापार्यंत बाळाची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाबरोबर इतरही यंत्रणा असल्या तरी गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होणे ही बाब गंभीर आहे. बालमृत्यूची आकडेवारी फुगने ही बाब आरोग्य विभागासाठी मंथन करायला लावणारी आहे.गर्भवतींकडे व नवजात बालकांच्या संगोपणाकडे होणारे दुर्लक्ष हे बालमृत्यूचे आकडे फुगवत आहेत.

उमलण्यापूर्वीच १५७ कळ्या कोमेजल्या
महिलांची गर्भावस्थेत कुटुंबातील लोक पाहिजे तशी विशेष काळजी घेत नसल्यामुळे हे जग पाहण्याच्या पूर्वीच १५७ कोवळ्या कळ्या कोमेजल्या आहेत. सन २०१७-१८ या वर्षात १५१ बालके आईच्या गर्भातच किंवा प्रसूती दरम्यान मृत्यू पावली. तर सन २०१८-१९ या वर्षात १०६ बालके आईच्या गर्भातच किंवा प्रसूती दरम्यान मृत्यू पावली. अत्यल्प कमी वजनाची जन्माला आलेली बालके कुपोषणामुळे मृत्यूच्या दाढेत जात आहेत. परंतु महिला व बालकल्याण विभाग या मृत्यूला कुपोषणाने मृत्यू झाल्याचे दाखवित नाहीत.
गर्भातच वाढतेय कुपोषण
गर्भवती महिलांना गर्भावस्थेत संतुलीत आहार देणे आवश्यक असतांना महिलांच्या दररोजच्या जेवणातून वरण हद्दपार झाला असतो. कडी, आळण किंवा वांग्याची भाजी यावरच त्यांचे दररोजचे जेवण असल्यामुळे बाळाला पोषण मिळत नाही. त्यातच गर्भावस्थेतही ग्रामीण भागात राहणारी महिला खूप कष्ट करते आणि पोटाला संतुलीत आहारही मिळत नाही. त्यामुळे पोटातच तिच्या बाळाची वाढ होत नाही. वाढ झाली तरी ती अत्यल्प प्रमाणात असते.असंतुलीत आहारामुळे कमी वजनाची बालके जन्माला येतात. त्यामुळे कमी वजनाच्या बालकांचा पोटातच किंवा जन्म घेतांना मृत्यू होतो. असंतुलीत आहारामुळे गर्भाची वाढ होत नाही त्यात व्यंगता येते परिणामी अर्भक मृत्यूदर वाढतो.

Web Title: 755 deaths in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.