७६० विद्यार्थिनी सायकलला मुकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 08:20 PM2019-04-26T20:20:42+5:302019-04-26T20:21:58+5:30
अतिमागास तालुक्यातील वर्ग ८ ते १२ च्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याची योजना सुरू करण्यात आली. मागील सहा वर्षापूर्वी पासून या योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. पूर्वी प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जात होता.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अतिमागास तालुक्यातील वर्ग ८ ते १२ च्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याची योजना सुरू करण्यात आली. मागील सहा वर्षापूर्वी पासून या योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. पूर्वी प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जात होता. परंतु यंदा फक्त ५७१ विद्यार्थिनींनाच सायकली देण्याची तरतूद आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत प्रत्येक तालुक्यातील ९५ म्हणजेच जिल्ह्यातील ७६० विद्यार्थिनींना सायकल पासून वंचित ठेवण्यात आले.
शाळेत जाण्यासाठी ८ ते १२ वी च्या मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी थेट त्यांच्या खात्यात तीन हजार रूपये टाकण्याची योजना शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत अमंलात आणली. शून्य ते पाच किमी अंतरावरून शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ देण्यात येतो. प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्यार्थ्यांना दरवर्षी सायकलींचा लाभ देणे आवश्यक होते. परंतु आता प्रत्येक तालुक्याला फक्त ५७१ सायकल देण्याचे ढिसाळ नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो गरीब विद्यार्थिनी सायकलींपासून वंचीत राहात आहेत.
गोंदिया जिल्ह्यात आठ तालुके असल्याने पाच हजार ३२८ विद्यार्थिनींना सायकलींचा लाभ देणे अपेक्षित होते. परंतु यंदा प्रत्येकच तालुक्यातील ९५ लाभार्थ्यांना लाभ देता येणार नाही असे ढिसाळ नियोजन करण्यात आले. त्यामुळे शेकडो विद्यार्थिनी सायकलपासून वंचीत आहेत.
जिल्ह्यात हजारो मुली या योजनेचा लाभ मागण्यासाठी हात पुढे करून आहेत. परंतु मानव विकास कार्यक्रम राबविणाºया अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हजारो विद्यार्थिनी वंचित राहात आहेत.
सन २०१३-१४ पासून या योजनेला सुरूवात करण्यात आली. पहिल्या वर्षी जिल्ह्यातील शंभर टक्के म्हणजे पाच हजार ३२८ मुलींना या योजनेचा लाभ देण्यात आला. परंतु त्यानंतर कमी मुलींना लाभ देण्यात आला. प्रत्येक तालुक्यातील ९५ विद्यार्थिनी अशाप्रकारे जिल्हाभरातील आठ तालुक्यातील ७६० विद्यार्थिनींना सायकलपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.
१० हजाराहून अधिक लाभार्थी प्रतीक्षेत
मानव विकास योजनेंतर्गत सायकल करीता आता तीन हजार ५०० रूपये देण्यात येत आहे. यासाठी गोरगरिबांच्या मुलींना या योजनेचा लाभ न देता आपल्या मर्जीतील लोकांच्या पाल्यांना सायकलचा लाभ देतात. उर्वरीत मुलींना या योजनेचा लाभ मिळत नाही. १० हजारांहून अधिक विद्यार्थिनींना सायकलची प्रतिक्षा आहे.
सायकलचे आमिष देत घेतात अॅडमिशन
विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालल्याने तुकडी टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी फिरू लागले आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींना अॅडमिशन घ्या सायकल देऊ असे आमिष दिले जात आहे. त्या आमिषाची काही ठिकाणी पुर्तता केली जाते, तर काही ठिकाणी पूर्तता केली जात नाही. मुलींना सायकलचे दिलेले आमिष पूर्ण करण्यासाठी मानव विकासच्या सायकलींचा आधार घेतला जात आहे.
सायकलची किंमत वाढल्याने ५०० रूपयांनी लाभात वाढ
सायकलचा लाभ देण्यासाठी मुलींना तीन हजार ५०० रूपये त्यांच्या खात्यात टाकले जाते. जिल्हा नियोजन अधिकारी हा निधी माध्यमिक शिक्षणाधिकाºयांकडे देतात, शिक्षणाधिकारी हा निधी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवतात व ते विद्यार्थिनींच्या खात्यात सुरूवातीला दोन हजार रूपये व मुलीने सायकल घेतल्यानंतर बील सादर केल्यास उर्वरित दीड हजार रूपये त्यांना दिले जाते. पूर्वी तीन हजार रूपये दिले जात होते. आता सायकलच्या किंमती वाढल्यामुळे तीन हजार ५०० रूपये लाभ देण्यात येतो.
एक कोटी ६० लाखांचेच नियोजन
सायकलच्या किमती वाढल्या त्यामुळे लाभार्थ्यांंना ५०० रूपये अधिक देण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्याला एक कोटी ६० लाख रूपये दिले जातात. पूर्वीचीच रक्कम जिल्ह्याला मिळत असते. आणि सायकलच्या किमतीत वाढ झाल्यामुळे कमी लाभार्थ्यांना लाभ देत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.