सात गावांमध्ये आठ कोटींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 12:25 AM2017-05-14T00:25:27+5:302017-05-14T00:25:27+5:30
सालेकसा तालुक्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीरित्या वाटचाल करीत असून या योजनेमुळे ...
जलयुक्त शिवार योजना : २०१७-१८ साठी निवड, २३० कामांचा धडाका
विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : सालेकसा तालुक्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीरित्या वाटचाल करीत असून या योजनेमुळे यंदा आणखी सात गावे सुजलाम सुफलाम होण्याच्या वाटेवर येत आहेत. तालुक्यातील सात गावांची निवड २०१७-१८ या वर्षासाठी झाली असून मागील तीन वर्षात तालुक्यातील एकूण २८ गावे जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. यात २०१५-१६ या वर्षात १३ गावे आणि २०१६-१७ या वर्षात आठ गावांची निवड करण्यात आली होती.
२०१५-१६ या वर्षी १३ गावांची निवड झाली होती. त्यापैकी जवळपास सर्वच कामे पूर्ण झाली असून २०१६-१७ वर्षातील आठ गावांची कांमे यंदा प्रगतीपथावर आहेत. ती सर्व कामे पावसाळापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन सात गावांची कामे येत्या वित्त वर्षात पूर्ण करण्यात येतील.
जलयुक्त शिवार योजनेत कामासाठी तीन बाबींचा समावेश असून पहिली बाब म्हणजे मंजूर अस्तीत्वातील योजनेंतर्गत जलंधारण कामे पूर्ण दुरुस्ती. दुसरी बाब म्हणजे नव्याने हाती घ्यावयाची कामे आणि तिसरी बाब म्हणजे अस्तीत्वातील जलस्त्रोताची दुरुस्ती व बळकटीकरण व गाळ काढणे या तीन बाबीचा समावेश असतो. आपल्या तालुक्यात पहिल्या बाबीची कामे निरंक अूसन दुसऱ्या आणि तिसऱ्या बाबीची कामे विविध यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येतील. यात विशेष करुन तालुकास्तरावरील पाच यंत्रणाकडे जलयुक्त शिवाराचे काम असेल यात कृषी विभाग, लघू पाटबंधारे विभाग, वन विभाग, लघू पाटबंधारे जल विभाग आणि पंचायत समिती या एकूण पाच यंत्रणाचा समावेश आहे.
नव्याने हाती घ्यावयाची कामे याबाबी अंतर्गत कृषी विभागाच्या माध्यमातून एक कोटी ३९ लाख ९२ रुपये रकमेची १०१ कामे केली जातील. लघू पाटबंधारे जि.प. विभागाद्वारे एक कोटी २४ लाख रुपयांची ६० कामे केली जातील. वन विभागामार्फत तीन कोटी तीन लाखांची ११ कामे केली जातील. लघू पाटबंधारे जल विभाग द्वारा एक कोटी ५९ लाख ३६ हजार रुपयांची ११ कामे केली जातील आणि पंचायत समिती मार्फत दहा लाख ३४ हजार रुपये रकमेची एकूण सात कामे केली जातील असे एकूण सात कोटी ३६ लाख ६६ हजार रुपयाची एकूण १९० कामे नव्याने हाती घेतलेली असणार. तिसऱ्या बाबीतील एकूण ४० कामांचा समावेश असून ही सर्व कामे कृषी विभागामार्फत होणार असून या कामाची अंदाजित रक्कम २० लाख ऐवढी आहे. दोन्ही बाबीमध्ये कृषी विभागाकडून एक कोटी ५९ लाख ९२ हजार रुपये रकमेची कामे केली जातील. पाचही यंत्रणेकडून एकंदरित सात कोटी ५६ लाख ६६ हजार रुपये रकमेची २३० कामे. तिसऱ्या टप्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत होणार आहेत.
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निवडलेल्या गावांच्या शिवारात नाला खोलीकरण, बोडी दुरुस्ती, गाळ काढणे या प्रकारच्या कामांवर अधिक भर देण्यात येत असून गावाच्या शिवारात पाण्याचे स्त्रोत वाढवून विविध उपाययोजना, वर्षभर पाणी मिळावे व जमिनीत पाण्याची पातळी वाढावी या बाबीवर जास्त भर देण्यात येत आहे. याशिवाय शेततळे, नाला बांधकाम, भातखाचर इत्यादी कामे सुद्धा करण्यात येतील. त्याच बरोबर गाव शिवारात पाण्याचे स्त्रोत वाढविण्यासाठी ज्या पद्धतीने कामे करता येऊ शकतील ती कामे करण्याचा प्रयत्न राहील.
या सात गावांची निवड
यंदा ज्या सात गावांची निवड जलयुक्त शिवार योजनेत करण्यातआली त्यात नवाटोला, जांभळी, महाराजीटोला, खडखडीटोला, रामाटोला, पिपरीया आणि निंबा या गावांचा समावेश आहे. यातील नवाटोला, जांभळी, महाराजीटोला आणि खडखडीटोला आणि निंबा ही पाच गावे एकात्मीक पाणलोट व्यवस्थापन समिती अंतर्गत होणार असून रामाटोला आणि पिपरीया या दोन गावाची कामे कोरडवाहू कार्यक्रमांतर्गत करण्यात येईल. स्थानिक आमदार संजय पुराम यांच्या शिफारशीनुसार वरील सात गावांना जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट करुन काम करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अभियंता, गटविकास अधिकारी, उपविभागीय अभियंता (जि.प.) तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्राधिकारी यांची सर्वानुमते मंजुरी मिळाली आहे.