८ वर्षांच्या मुलाला १.२० लाखात विकले; पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 10:19 PM2022-03-07T22:19:44+5:302022-03-07T22:21:39+5:30

Gondia News ज्या महिलेकडे आपला मुलगा दिला तिच्याजवळ आपला मुलगाच नाही अशी खात्री पटताच आईने गोंदिया शहर पोलिसात धाव घेतली.

8-year-old sold for Rs 1.20 lakh; Five arrested | ८ वर्षांच्या मुलाला १.२० लाखात विकले; पाच जणांना अटक

८ वर्षांच्या मुलाला १.२० लाखात विकले; पाच जणांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देसांभाळ करण्यासाठी दिलेल्या मुलाची विक्री पोलीस मुख्य आरोपीच्या शोधात

नरेश रहिले

गोंदिया : पहिल्या पतीपासून झालेला मुलगा दुसऱ्या महिलेला सांभाळ करण्यासाठी देऊन स्वत: दुसरे लग्न करणारी आई दोन वर्षांनंतर आपल्या मुलाची विचारपूस करण्यास गेली. परंतु ज्या महिलेकडे आपला मुलगा दिला तिच्याजवळ आपला मुलगाच नाही अशी खात्री पटताच आईने गोंदिया शहर पोलिसात धाव घेतली. गोंदिया पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केली असता त्या ६ वर्षांच्या मुलाची १ लाख २० हजार रुपयात भंडारा जिल्ह्यात विक्री केल्याचे पुढे आले आहे.

गोंदियातील इंदू (बदललेले नाव) हिला पहिल्या पतीपासून असलेला चिकू (बदललेले नाव) याला सन २०२० मध्ये गोंदियातील मंगला उर्फ मनीषा संतोष चंद्रिकापुरे हिच्याकडे सांभाळायला विश्वासाने दिले होते. मंगला चंद्रिकापुरे हिने इंदूचे लग्न जळगावच्या चारडी येथील एका इसमाशी लावून दिले. तुझ्या मुलाचे मी संगोपन करेन, असे तिने इंदूला म्हटले होते. मंगलावर विश्वास ठेवून दुसरे लग्न करणारी इंदू मुलाच्या भेटीसाठी २२ फेब्रुवारी २०२२ रोजी गोंदियात आली असता आरोपी मंगलाकडे तिचा मुलगा नव्हता. तिने मुलासंदर्भात विचारपूस केली. त्यावेळी तिने उत्तर दिले नाही. माझ्या मुलाचे अपरहण झाले असावे किंवा त्याची विक्री झाली असावी, असा संशय घेऊन त्या आईने गोंदिया शहर पोलिसात तक्रार केली.

गोंदिया पोलिसांनी १ मार्च रोजी या संदर्भात भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलीस माहिती काढत असतानाच तो मुलगा भंडारा जिल्ह्याच्या आंधळगाव येथे असल्याची माहिती मिळाली. साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस हवालदार जागेश्वर उईके, पोलीस नायक शिपाई योगेश बिसेन, छगन विठ्ठले, महिला पोलीस शिपाई व डीबी पथकाने इंदूला घेऊन आंधळगाव गाठून त्या बालकाला आपल्याजवळ घेतले. आंधळगाव येथील कजोळ छोटेलाल भुरे (४२) व त्याची पत्नी अनिता कजोळ भुरे (३५) यांच्या घरी चिकू आढळून आला. त्या दोघांनी गोंदियाच्या कुंभारेनगरातील मनीषा उर्फ मंगला संतोष चंद्रिकापुरे या महिलेला १ लाख २० हजार रुपये घेऊन तिच्याकडून खरेदी केल्याचे समजले. या प्रकरणी गोंदिया पोलिसांनी कलम ३७०, सहकलम बालहक्क व संरक्षण अधिनियम कलम ७५, ८०, ८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पाच आरोपींना अटक

या प्रकरणी कजोळ छोटीलाल भुरे (४२) व अनिता कजोळ भुरे (३५, दोन्ही रा. आंधळगाव, ता. मोहाडी, जि. भंडारा), मंगला उर्फ मनीषा संतोष चंद्रिकापुरे (३५, रा. कुंभारेनगर, गोंदिया), सुखदेव केशोराव डोये (५४, रा. सकरला आंधळगाव), अनिता अरविंद हटवार (३९, रा. चिचोली आंधळगाव) अशा पाच जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी आरोपी फरार असल्याचे समजते.

स्वाक्षरी करणाराही अडकला

या बालकाची खरेदी-विक्री करताना नोटरी करण्यात आली होती. या नोटरीवर आरोपी सुखदेव केशोराव डोये (४५) याने स्वाक्षरी केली होती. आरोपी अनिता अरविंद हटवार (३९, रा. चिचोली) हिने मध्यस्थी करून पैसे घेतले होते. बालकाची विक्री करून दत्तक घेतल्याचे मुद्रांकावर लिहून घेतले.

Web Title: 8-year-old sold for Rs 1.20 lakh; Five arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.