८० टक्के बाबाटोलीवासीय निवाऱ्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:33 AM2018-09-19T00:33:54+5:302018-09-19T00:37:33+5:30
एकीकडे डिजीटल इंडियाचा मोठा गाजावाजा केला जात आहे. भारत देश जगाच्या इतर विकसित देशासोबत स्पर्धा करीत असल्याचे सांगितले जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना घर मिळण्याचे स्वप्न दाखवित आहे.
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : एकीकडे डिजीटल इंडियाचा मोठा गाजावाजा केला जात आहे. भारत देश जगाच्या इतर विकसित देशासोबत स्पर्धा करीत असल्याचे सांगितले जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना घर मिळण्याचे स्वप्न दाखवित आहे. मात्र आजही अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सोयींपासून वंचित असलेले लाखो कुटुंब आहेत. त्याचेचे एक ज्वलंत उदाहरण सालेकसा येथील बाबाटोली येथे पहायला मिळते. येथील फकीर समाज मुलभूत गरजांपासून दूर असून ८० टक्के नागरिकांना राहण्यासाठी निवाराच नाही.
जवळपास ३० वर्षांपूर्वी फकीर समाजाचे काही लोक आपल्या कुटुंबासह सालेकसा येथे राहण्यासाठी आले. त्यानंतर तिथेच डेरा टाकून राहू लागले. काही काळानंतर येथेच स्थायी झाल्याने त्यांना सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालच्या मागील परिसरातील मोकळी जागा उपलब्ध करुन देण्यात आली.
येथील फकीर समाजाचे लोक पूर्वी आमगाव खुर्द ग्रामपंचायत (आता सालेकसा नगर पंचायत) चे नागरिक झाले.त्यांची नावे सुद्धा मतदार यादीमध्ये आली. सध्या स्थितीत येथील ८० ते ९० नागरिक मतदानाचा हक्क बजावितात. जवळपास ५० कुटुंब स्थायी व २० कुटुंब अस्थायी स्वरुपात येथे वास्तव्य करीत आहे. मात्र दुर्देवाची बाब म्हणजे मागील ३० वर्षांपासून फकीर समाजाला मुलभूत गरजा भागविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तर ८० टक्के कुुटुंब आजही उघड्यावर राहत आहे. लोकमत प्रतिनिधीने बाबाटोली येथे भेट दिली असता त्यांच्या निवाऱ्याचे विदारक चित्र पाहून मन विचलित झाले. त्यांना घरकुल योजनेबद्दल विचारले असता टोलीमध्ये आत्तापर्यंत केवळ १०-१२ कुटुंबानाच घरकुलाचा लाभ मिळाला आहे. तर ४० स्थायी कुटुंबाना घरकुलाचा लाभच मिळाला नाही. २० अस्थायी कुटुंबांना निवाऱ्याची गरज असताना सुद्धा त्यांना घरकुलाचे निकष लागू होत नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. परिणामी त्यांना उघड्यावरचे जीवन जगावे लागत आहे. टोलीतील नागरिकांकडून माहिती घेत असताना टोलीतील सगळे धावून आले, आम्हालाही घरकुल मिळवून द्या हो साहेब, आपले लई उपकार होतील. आम्ही मुला-बाळांसह उघड्यावर राहतो. पोटासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो, अशी आर्त हाक टोलीतील महिला व पुरूषांनी दिली. राजमा कुर्बान शाह नावाची एक गर्भवती महिला, काही दिवसातच बाळंतीन होणार असून ती आपल्या कुटुंबासोबत कापडी भिंत आणि छत लावलेल्या झोपडीत वास्तव्य करीत आहे. तर मुस्कान आरीफ शाह यांचे कच्चे घर पावसाळ्यात कोसळले. बहुतेक लोकांचे घर कापडी किंवा प्लास्टिक छताचे असल्याने उन्ह वारा पावसाचा मारा सहन करीत त्यांना जीवन जगावे लागत आहे.
मिळेल ते काम फकीर समाजाचे
बहुतेक लोक तांबा,पितळ आणि इतर स्वस्त धातुचे दागिणे विकण्याचे काम गावोगावी फिरुन करतात. बरेचदा यातून मिळणाऱ्या पैशातून दैनदिन गरजा सुध्दा भागविणे शक्य होत नाही. काही लोक फकीर बाबा बनून भीक्षा मागतात. येथील अपंग लोक रेल्वेत भीख मागण्याचे काम करतात. येथील महिला सुद्धा गावोगावी फिरुन छोट्या मोठ्या वस्तुंची विक्री करुन आपला उदरनिर्वाह करतात
आमगाव खुर्द ग्रामपंचायत असताना मागील काही वर्षापूर्वी येथील कुटुंबाना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून अर्ज भरण्यात आले. त्यात १८ पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले होते. जवळपास १० ते १२ लोकांचे घरकुल तयार करण्यात आले आहेत. इतर लोकांना लाभ देण्यासाठी पात्रतेच्या श्रेणीत आणण्यासाठी कारवाही करावी लागेल.
- किशोर आचले, ग्रामविकास अधिकारी, सालेकसा.