८१ हजार अंत्योदय शिधापत्रिकांवर मिळणार मोफत साडी
By कपिल केकत | Published: January 29, 2024 07:52 PM2024-01-29T19:52:29+5:302024-01-29T19:52:47+5:30
अंत्योदय लाभार्थ्यांसाठी गिफ्ट : होळीपर्यंत करावयाचे आहे वितरण
गोंदिया: अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबातील महिलांना शासनाच्या माध्यमातून आता दरवर्षी प्रत्येकी एक साडी भेट म्हणून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील ८१ हजार ४८२ अंत्योदय शिधापत्रिकांवर ही साडी स्वस्त धान्य दुकानांत दिली जाणार आहे. राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि. १० नोव्हेंबर २०२३ रोजी अंत्योदय शिधापत्रिकांवर प्रती शिधापत्रिका एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. आता या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ साड्यांचे गठे जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकांच्या यादीनुसार प्रत्येक तालुक्यातील रास्तभाव दुकानांच्या नावानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या तालुकास्तरावरील गोदामात पोहोचविणार आहे.
जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी करण्याची तयारी जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे.
------------------------
प्रत्येकी ३५५ रुपयांची साडी मोफत
- शासनाच्या निर्णयानुसार महामंडळ ३५५ रुपयांप्रमाणे साडीची खरेदी करणार आहे. २०२३-२४ या वर्षासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येकी ३५५ रुपयांप्रमाणे साडीची खरेदी होणार आहे. तथापि, महामंडळाला हा सारा खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून पुरवला जाणार आहे.
------------------------------
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र
- राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि. १० नोव्हेंबर २०२३ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार अंत्योदय शिधापत्रिकांवर प्रती शिधापत्रिका एक साडी मोफत वितरित करण्यासाठी आवश्यक कार्यवाहीबाबत सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दि. २३ जानेवारीला पत्र देण्यात आले आहे.
-----------------------------
दरवर्षी मिळणार एक साडी
- महिलांना दरवर्षी एक साडी मोफत मिळणार असून, साडीचे वितरण रास्तभाव दुकानदारांच्या माध्यमातूनच केले जाणार आहे. म्हणजेच आता रेशन दुकानावर फक्त अन्नधान्यच मिळणार नसून, अन्नधान्यासोबतच साडीचेदेखील वितरण होणार आहे.
-------------------------
प्रजासत्ताक दिनापासून होळीपर्यंत वितरण
- या योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या साडीचे वितरण एका विशिष्ट सणाच्या दिवशी केले जाणार आहे. यंदा प्रजासत्ताक दिनापासून ते होळी सणादरम्यान अंत्योदय शिधापत्रिकांवर प्रती शिधापत्रिका एक साडी याप्रमाणे याचे वितरण लाभार्थींना केले जाणार आहे. मात्र जिल्ह्यात अद्याप साडी आलेली नाही.
--------------------------
- राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार रास्तभाव दुकानातून अंत्योदय शिधापत्रिकांवर प्रती शिधापत्रिका एक साडी वितरित केली जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी होळीच्या सणापर्यंत केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून मिळाली.
--------------------------------
कोणत्या तालुक्यात किती अंत्योदय शिधापत्रिका
आमगाव- ८,६६०
अर्जुनी-मोरगाव- १०,८३७
देवरी-८,७७८
गोंदिया- १६,०३५
गोरेगाव- ९,७३६
सडक-अर्जुनी- ८,७०५
सालेकसा- ७,५८९
तिरोडा- ११,१४२