गोरगरिबांच्या ८७६ मुलांचा होणार आरटीई प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:32 AM2021-03-01T04:32:58+5:302021-03-01T04:32:58+5:30
गोंदिया : बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकातील बालकांकरिता इंग्रजी माध्यम, विना अनुदानित ...
गोंदिया : बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकातील बालकांकरिता इंग्रजी माध्यम, विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे. ३ ते २१ मार्च, २०२१ या कालावधीत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया घेण्यात येत आहे. दिलेल्या मुदतीत पालकांनी आपल्या पाल्यांची ऑनलाइन नोंदणी करायची आहे.
गोंदिया जिल्ह्यातील १४६ शाळांमध्ये ९७६ मुलांना मोफत प्रवेश मिळणार आहे. १ ऑक्टोबर, २०१४ ते ३१ डिसेंबर, २०१५ या कालावधीच्या दरम्यान जन्मलेली बालके ऑनलाइन प्रवेश नोंदणीकरिता पात्र राहणार आहेत. तालुक्याच्या गटसाधन केंद्रस्थळी मदत व तक्रार निवारण केंद्र तयार करण्यात आले आहेत. आमगाव तालुक्यातील १२ शाळांत ८३ जागा, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३ शाळांत १०० जागा, देवरी तालुक्यातील १० शाळांत ४४ जागा, गोंदिया तालुक्यातील ५८ शाळांत ३४९ जागा, गोरेगाव तालुक्यातील १५ शाळांत ७९ जागा, सडक-अर्जुनी तालुक्यातील १० शाळांत ४१ जागा, सालेकसा तालुक्यातील ७ शाळांत ४७ जागा, तिरोडा तालुक्यातील २१ शाळांत १३३ जागा आहेत. या कालावधीमध्ये सर्व पालकांनी आपल्या पाल्याची नोंदणी करावी, असे शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, सहायक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले, संगणक प्रोग्रामर नितेश खंडेलवाल, मनोजकुमार शेणमारे यांनी कळविले आहे.
बॉक्स
ही लागणार कागदपत्रे
जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा सर्व घटकांना आवश्यक, सामाजिक वंचित घटकातील पालकांचा जातीचा दाखला अनिवार्य, आर्थिक दुर्बल घटकातील पालकांचा १ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता ४० टक्केपेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र, पाल्य व पालक यांचे आधार कार्ड जमा करावे.