जिल्ह्यात ८८ मुले शाळाबाह्य (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:27 AM2021-03-25T04:27:30+5:302021-03-25T04:27:30+5:30
गोंदिया : कोरोनामुळे इतर जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात परतलेल्या किंवा इतर राज्यातून जिल्ह्यात परतलेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. शाळाबाह्य मुलांची ...
गोंदिया : कोरोनामुळे इतर जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात परतलेल्या किंवा इतर राज्यातून जिल्ह्यात परतलेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम ५ ते १५ मार्च दरम्यान राबविली असता या मोहिमेत ८८ मुले-मुली शाळाबाह्य आढळली. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात शिक्षण विभाग आणत आहे.
कुणीही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली. अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात आली आहे. कोविड-१९ संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. ६ ते १८ वयोगटातील अनेक बालके शाळाबाह्य झाल्याचे दिसून येतात. अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी राज्य शासनाने २३ फेब्रुवारी २०२१ च्या शासननिर्णयानुसार विशेष शोधमोहीम राबविण्याचे ठरविले आहे. या मोहिमेनुसार ३ ते ६ वयोगटातील जी बालके एकात्मिक बाल विकास योजनेचा लाभ घेत नाहीत तसेच खासगी बालवाडी, इंग्रजी माध्यमांच्या ज्युनिअर केजी, सिनिअर केजीमध्ये जात नाहीत. ६ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य बालकांची शोधमोहीम ५ ते १५ मार्च २०२१ पर्यंत या कालावधीत राबविण्यात आली. यात ८८ बालके शाळाबाह्य आढळल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी दिली.
.......
तालुकानिहाय शाळाबाह्य मुलांची आकडेवारी
आमगाव-००
अर्जुनी-मोरगाव-००
देवरी-००
गोंदिया-२१
गोरेगाव-२५
सडक-अर्जुनी-१५
सालेकसा-११
तिरोडा-१६
एकूण-८८
........
गोरेगाव तालुक्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले
गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यांची पाहणी केली असता गोरेगाव तालुक्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले आहेत. यात ६ ते १४ वर्षे वयाेगटात कधीच शाळेत न गेलेल्या मुली १० तर ९ मुलांचा समावेश आहे. अनितमित उपस्थितीमुळे शाळेत न गेलेले शाळाबाह्य मुले ३ व मुली ३ अशी एकूण २५ बालके शाळाबाह्य आढळली आहेत.
........
५१.१३ टक्के मुली शाळाबाह्य
६ ते १४ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम ५ ते १५ मार्च दरम्यान राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ८८ बालके शाळाबाह्य आढळली. त्यातील ४५ मुली म्हणजेच ५१.१३ टक्के मुली शाळाबाह्य आढळल्या आहेत. मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे.
.....
९९२९ कर्मचारी मोहिमेत
शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षण विभागातील यंत्रणा कामाला लागली होती. १० दिवस सतत झालेल्या सर्वेक्षणात ............... कर्मचारी शोधमोहीम राबवीत होते. यात उच्च माध्यमिक शिक्षक ९ हजार ९२९, अंगणवाडी सेविकांचेही सहकार्य मिळाले.
........
कोट
शाळा बंद न ठेवता विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन प्रभावित होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. कुटुंबाची शाळाबाह्य शोधमोहीम करीत असताना अंगणवाडी सेविका, मदतनीस व शिक्षकांनी एकत्रितपणे सर्वेक्षण केले आहेत. दैनिक आढावा जिल्हास्तरावर कळविण्यात आला आहे.
-राजकुमार हिवारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प. गोंदिया.