९४ टक्के तलावांत ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 09:36 PM2018-04-12T21:36:49+5:302018-04-12T21:36:49+5:30
शेकडोच्या संख्येने तलाव, बोडींसह लघु व मध्यम प्रकल्पांची सोय असलेल्या सालेकसा तालुक्यातील ९४ टक्के तलावात पाणी आटले असून तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर लघु प्रकल्प आणि मध्यम प्रकल्पसुद्धा राखीव पाण्याच्या पातळीवरुन घसरले आहेत. काही लघु प्रकल्पसुद्धा कोरडे पडले आहेत.
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : शेकडोच्या संख्येने तलाव, बोडींसह लघु व मध्यम प्रकल्पांची सोय असलेल्या सालेकसा तालुक्यातील ९४ टक्के तलावात पाणी आटले असून तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर लघु प्रकल्प आणि मध्यम प्रकल्पसुद्धा राखीव पाण्याच्या पातळीवरुन घसरले आहेत. काही लघु प्रकल्पसुद्धा कोरडे पडले आहेत. आतापासूनच जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु झाल्याचे चित्र आहे.
तालुक्यात एप्रिल महिन्यातच पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाल्याने पुढील तीन महिने पाण्याअभावी कसे जाणार, अशी चिंता तालुकावासीयांना सतावित आहे. तालुक्यात माजी मालगुजारी तलाव (मामा तलाव) एकूण १६१ असून यापैकी जेमतेम सहा तलावांत थोड्या प्रमाणात पाणी शिल्लक असून बाकीचे सर्व तलाव कोरडे झाले आहेत. मामा तलावांपैकी फक्त ३.७२ टक्के तलावांत पाणी उरले असून तेसुद्धा पुढील एका महिन्यात संपूर्ण नाहिसे होईल व सर्व मामा तलाव कोरडे पडण्याची शक्यता आहे.
लघू पाटबंधारे विभागातर्गंय तालुक्यात एकूण २९ तलाव असून त्यापैकी पाच तलावांमध्येच पाणी शिल्लक आहे. एकूण १७ टक्के तलावांत पाणी शिल्लक आहे. लघु सिंचन प्रकल्पाचे एकूण १२० तलाव असून या तलावांपैकी २० टक्के पाणी साठा शिल्लक आहे. तलावाच्या भरवशावर पाण्याची गरज भागविणारे प्राणी कुठे जातील, असा प्रश्नसुद्धा उपस्थित झाला आहे.
मध्यम प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा
तालुक्यात पुजारीटोला धरणासह कालीसरार, मानागड, मानाकुही यासारखे मध्यम प्रकल्प सुद्धा आहेत. परंतु या मध्यम प्रकल्पामध्येही पुरेसा पाणीसाठा राहिलेला नाही. पुजारीटोला धरणात राखीवपेक्षा कमी पाणी असून या धरणातून मोेठे कालवे गेलेले आहेत. ते सालेकसासह आमगाव, गोंदिया तालुक्याला आणि मध्यप्रदेशच्या लांजी, किरणापूर तालुक्याला सुद्धा पाणी पुरवठा करतात. परंतु यासाठी सिरपूरबांधचे पाणी असून वितरित करावे लागते. मात्र जलाशयात मोजके पाणी असून पाण्याचा अपव्यय थांबविणे मोठे आवाहन आहे.
साठवण बंधारे १०० टक्के कोरडे
तालुक्यात एकूण लोप बंधारे ४१ असून साठवण बंधारे १६८ च्या संख्येत आहेत. परंतु सदर दोन्ही प्रकारचे बंधारे कोरडे पडले असून सध्या शंभर टक्के उपयोगहीन झाले आहेत. लघू बंधारे व साठवण बंधारे जनावरांसाठी पाण्याची सोय म्हणून फार उपयोगी असतात. परंतु आता त्यात पाणीच नाही. त्यामुळे त्याकडे कोणी ढुकूनसुध्दा पाहत नाही. सदर बंधाऱ्यांमध्ये पाणी उरले नसल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. अनेक वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. त्यामुळे मानवी वस्तीत धोका निर्माण होत आहे. परंतु त्यापेक्षा मोठे संकट वन्यप्राण्यांच्या जीवावरही ओढवले आहे. त्यामुळे साठवण बंधाºयामध्ये शासनस्तरावर तात्पुरता पाण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.
काही मोजक्या तलावांमध्ये पाणी
तालुक्यातील ९० टक्क्यांच्या वर तलाव कोरडे झाले असून काही गावामध्ये पाण्याचे संकट भासू लागले आहेत. तर तालुक्यातील काही मोजके तलाव आहेत, त्यात १० ते १५ टक्के जलसाठा उरलेला आहे. अनेक ठिकाणी पाच टक्केही जलसाठा राहिला नाही. मामा तलावांपैकी हलबीटोला, झालीया, कावराबांध, जोशीटोला, मरकाखांदा, रामसागर (मानागढ) येथील तलावांत काही प्रमाणात पाणी उरले आहे. लघु पाटबंधारेपैकी भजियादंड, पाऊलदौना, पिपरिया, बिजेपार या ठिकाणी पाण्याचा साठा शिल्लक आहे.