साथीसाठी ९७ गावे जोखीमग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 12:09 AM2017-06-22T00:09:11+5:302017-06-22T00:09:11+5:30

पावसाळ्यात साथीचे आजार पसरत असल्याने साथीचे आजार पसरू नये यासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग सक्रीय झाला आहे.

9 7 villages risked for conflict | साथीसाठी ९७ गावे जोखीमग्रस्त

साथीसाठी ९७ गावे जोखीमग्रस्त

Next

तीन ग्राम पंचायतींना रेडकार्ड : तीन वर्षांत सहा गावात साथीचा उद्रेक
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पावसाळ्यात साथीचे आजार पसरत असल्याने साथीचे आजार पसरू नये यासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग सक्रीय झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील ९७ गावे साथीच्या आजारासाठी अत्यंत संवेदनशील मानल्या जाऊ लागल्याने या गावांकडे विशेष लक्ष देण्याचा इशारा आरोग्य विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.
पावसाळा सुरू झाला आहे. कधी जोराने पाऊस बरसेल याचा नेम नाही. त्यासाठी पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नये तसेच साथीचे आजार पसरू नये यासाठी आरोग्य विभागाने गावागावात औषध साठा पोहचविला आहे. गोंदिया जिल्ह्यात धरण, तलाव, नद्या असल्यामुळे अतिवृष्टीच्या वेळी पूरपरिस्थिती लवकरच निर्माण होते. नदीच्या काठावरील गावे ही पूर सदृस्य गावे गणली जातात. गोंदिया जिल्ह्यातील ८८ गावे ही पूरग्रस्त आहेत. तर साथीच्या आजाराला आमंत्रण देणारे ९७ गावे जोखीमग्रस्त असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. गोंदिया जिल्ह्यातून वैनगंगा, गाढवी, वाघनदी, पांगोली, चुलबंद ह्या नद्या वाहतात.या नद्यांच्या काठावरील ८८ गावे ही पूराने नेहमी वेढली जातात. अश्या गावात पिण्याचे शुध्द पाणी मिळत नसल्याने या गावात साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्याच्या तीन महिन्यात साथीच्या आजारावर सहजरित्या मात करता येईल यासाठी आरोग्य विभागाने गावागावात औषध पोहचविली आहे. साथीच्या आजारासाठी संवेदनशील मानल्या जाणाऱ्या गावांसाठी प्रत्येकी एक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याला समन्वयक म्हणून नेमले आहे. साथीचे आजार पसरू नये यासाठी आरोग्य विभागातर्फे जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींच्या पाण्याची तपासणी करण्यात आली. यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत ७५ टक्यापेक्षा अधिक टक्के पाणी दूषीत असेल त्या गावाला रेडकार्ड जिल्हा परिषदेकडून दिला आहे. यंदा रेडकार्ड असलेल्या जिल्ह्यातील तीन ग्राम पंचायती आहेत. टोयागोंदी, येडमाकोट व नवेगाव ह्या तीन ग्राम पंचायती रेडकार्डमध्ये आहेत. साथीच्या आजारासंदर्भात उपचारासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील जलसरक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या सहा गावात साथीचा उद्रेक
मागील तीन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील या सहा गावात साथीचा उद्रेक झाला आहे. सुकडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ठाणेगाव, केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ईळदा, खमारी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत फुलचूर, धाबेपवनी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नवेगावबांध, फुटाणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नक्टीटोला, ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ककोडी ह्या सहा गावात साथीचा उद्रेक झाला होता.

हे करा, ते करू नका
पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे, पिण्याचे पाणी झाकून ठेवावे, पाणी घेण्यासाठी ओगराळ्याचा किंवा लांब दांड्याच्या भांड्याचा वापर करावा, जेवणापूर्वी व बाळास भरविण्यापूर्वी हात साबणाने किंवा राखेने स्वच्छ धुवावेत, पाणी शुध्द करण्यासाठी क्लोरीनच्या गोळ्या किंवा द्रावण टाकावेत, शौचाला जाऊन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, जुलाब झाल्यास ओआरएस पाकीटे शासकीय, निमशासकीय दवाखान्यातून मोफत घ्यावीत, तसेच ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी, आंबील भरपूर प्यावी, उघड्यावरील अन्न, कापलेली फळे खाऊ नयेत, उघड्यावर माशा बसलेले अन्न खाऊ नये, उघड्यावर शौचास बसू नये, अस्वच्छ वअसुरक्षीत पाणी पिऊ नये, असे आवाहन जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.भुमेश्वर पटले यांनी केले आहे.

शीघ्र प्रतिसाद पथक
साथीच्या आजारावर वेळीच मात करण्यासाठी आरोग्य विभागाने शीघ्र प्रतिसाद पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, बालरोग तज्ज्ञ, सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ, जिल्हा हिवताप अधिकारी, सामान्य वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे.

 

Web Title: 9 7 villages risked for conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.