९ कोटी रुपयांची खरेदी अन् ९० लाखांचे चुकारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:05 AM2018-11-14T00:05:15+5:302018-11-14T00:07:12+5:30
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आत्तापर्यंत जिल्ह्यातील ५७ शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून एकूण ५२ हजार ६९१ क्विंटल धान खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत ९ कोटी २२ लाख ९ हजार रुपये होत असून यापैकी आत्तापर्यंत ९० लाख रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आत्तापर्यंत जिल्ह्यातील ५७ शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून एकूण ५२ हजार ६९१ क्विंटल धान खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत ९ कोटी २२ लाख ९ हजार रुपये होत असून यापैकी आत्तापर्यंत ९० लाख रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने धानाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर कृषी विभागाकडून यावर्षी धानाचे चांगले उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत एकूण ५७ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन ५२ हजार ६९१ क्विंटल धान खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या धानाची एकूण किमंत ९ कोटी २२ लाख ९ हजार रुपये असून यापैकी ९० लाख ९९ हजार ३८८ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. तर खरेदी केलेल्या धानाच्या तुलनेत अद्याप ८ कोटी ३१ लाख १० हजार रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळायचे आहे. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना सुध्दा धानाचे चुकारे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.
हेक्टरी खरेदीचा संभ्रम कायम
शासकीय धान खरेदी केंद्रावर प्रती हेक्टरी किती क्विंटल धान खरेदी करायची हे निश्चित केले जाते. मात्र यावर्षी धान खरेदी सुरूवात झाली तर प्रती हेक्टरी किती क्विंटल धान शेतकऱ्यांकडूृन खरेदी करायचे हे अद्यापही निश्चित झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे.
मागील वर्षी ७ लाख ८१ हजार क्विंटल धान खरेदी
मागील वर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने एकूण ५ लाख २५ हजार १६ क्विंटल धान खरेदी केली होती. तर रब्बी हंगामात ५६ हजार क्विंटल धान खरेदी केली. मागीलवर्षी एकूण २१ हजार ४०० शेतकऱ्यांकडून खरीप आणि रब्बी मिळून ७ लाख ८१ हजार क्विंटल धान खरेदी केली. मागील वर्षीच्या खरेदीचा विचार केल्यास अजून भरपूर धान खरेदी होणे शिल्लक आहे.