९० वर्षांची म्हातारी पेंशनसाठी बँकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:20 AM2018-01-18T00:20:49+5:302018-01-18T00:22:43+5:30
शासनाकडून श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना राबविली जाते. त्यासाठी वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्यांना लाभ दिला जातो. त्यापैकीच एक परसटोला येथील ताराबाई असून त्यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केली तरी बँकेत त्या पेंशनसाठी जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोठणगाव : शासनाकडून श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना राबविली जाते. त्यासाठी वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्यांना लाभ दिला जातो. त्यापैकीच एक परसटोला येथील ताराबाई असून त्यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केली तरी बँकेत त्या पेंशनसाठी जात आहेत.
परसटोला गाव केशोरीपाूसन १० किमी अंतरावर आहे. परिसरात राष्ट्रीयकृत बँक तिबेट कॅम्प येथे आहे. तेथे युनियन बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. सदर बँकेमध्ये ये-जा करण्यासाठी प्रवासाची सोय नाही. त्यामुळे बँक ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.
ताराबाईचा पुतण्या सिद्धार्थ सांगोळे यांनी एका सोबत्यासह ताराबाईला मोटार सायकलवर बँकेत आणले होते. दरम्यान त्यांना दुपारच्या १२ ते ४ वाजेपर्यंत ताटकळत रहावे लागले. ताराबाई उभ्या राहू शकत नाही. उभे राहण्यासाठी दोन माणसांचा आधार घ्यावा लागतो. दिवसभर बसून त्यांना कंबरेचा त्रास वाढल्याने असह्य वेदना होऊ लागल्या. तेवढ्यात लोकमतचे प्रतिनिधी यांनी ताराबाईची विचारपूस केली व लगेच बँक व्यवस्थापकांशी संपर्क साधून पैशाची उचल करवून दिली.
विशेष म्हणजे वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांच्या व्यवहारासाठी बँकेत वेगळी व्यवस्था करून त्वरित लाभ देण्याची उपाययोजना करण्यात यावी. असे झाले तर त्यांना होणारा त्रास वाचू शकेल.
चढाव्या लागतात १६ पायऱ्या
युनियन बँक आॅफ इंडिया शाखा तिबेट कॅम्प येथे आहे. शाखा वरच्या माळ्यावर आहे. त्यामुळे १६ पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्या उभ्या स्वरुपात आहेत. म्हाताऱ्यांना वर चढता येत नाही. बँक कर्मचारी सह्यांकरिता खाली येतो. परंतु सही घेवून अग्रक्रमाने काम करीत नाही. त्यामुळे मोठाच त्रास सहन करावा लागतो.