95 मालमत्तांना ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:00 AM2021-02-20T05:00:00+5:302021-02-20T05:00:22+5:30
आतापर्यंत नगरपरिषद मालमत्ता वसुलीसाठी पथकाला नानाविध अडचणींचा सामना करावा लागत होता. कधी राजकीय दबाव तर कधी थकबाकीदारांकडून भांडण तंटे केले जात असल्याने करवसुली होत नव्हती. परिणामी यंदा ११ कोटींच्या घरात मागील थकबाकी व चालू मागणीचा आकडा पोहोचला आहे. मात्र, विद्यमान मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी यंदा करवसुलीसाठी विभागाला कुणालाही न जुमानता थेट कारवाईचे अधिकारी दिले आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मालमत्ता करवसुलीसाठी यंदा नगरपरिषदेने कंबर कसली असून करवसुली पथक जोमाने कामाला लागले आहे. विशेष म्हणजे, यंदा पथकाने कुणाचाही गय न करता थकबाकीदारांवर थेट कारवाईचा सपाटाच सुरू केला आहे. याअंतर्गत एक कोटी ३२ लाख सात हजार रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी पथकाने शहरातील ९५ मालमत्तांना सील ठोकले आहे. यामध्ये सर्वाधिक दुकानांचा समावेश आहे. करवसुली पथकाकडून होत असलेल्या सिलिंगच्या कारवाईमुळे थकबाकीदार चांगलेच धास्तीत आले आहेत.
आतापर्यंत नगरपरिषद मालमत्ता वसुलीसाठी पथकाला नानाविध अडचणींचा सामना करावा लागत होता. कधी राजकीय दबाव तर कधी थकबाकीदारांकडून भांडण तंटे केले जात असल्याने करवसुली होत नव्हती. परिणामी यंदा ११ कोटींच्या घरात मागील थकबाकी व चालू मागणीचा आकडा पोहोचला आहे. मात्र, विद्यमान मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी यंदा करवसुलीसाठी विभागाला कुणालाही न जुमानता थेट कारवाईचे अधिकारी दिले आहेत.
त्यामुळे कर अधिकारी व उपमुख्याधिकारी विशाल बनकर यांनी पथक स्थापन केले असून वसुली मोहिमेला सुरूवात केली आहे. हे पथक थकबाकीदारांकडे जात असून कराचा भरणा केल्यास थेट सीलिंगची कारवाई करत आहे. यातूनच पथकाने आतापर्यंत एक कोटी ३२ लाख सात हजार रुपयांचा मालमत्ता कर थकवून बसलेल्या मालमत्ताधारकांच्या ९५ मालमत्तांना सील ठोकले आहे.
सील ठोकण्यात आलेल्या या मालमत्तांमध्ये सर्वाधिक ६७ दुकानी असून ९ घर, ४ मोबाईल टॉवर, १ बँक, ५ एटीएम, ३ खासगी इमारत, २ शासकीय इमारत, २ हॉटेल व २ गोदाम आहेत.
एक कोटी ३२ लाख सात हजार रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी करवसुली पथकाने या मालमत्तांना सील ठोकले आहे. दररोज करवसुली पथक वसुलीसाठी थकबाकीदारांकडे जात असून कराचा भरणा न करण्यांची मालमत्ता सील करत आहेत. परिणामी थकबाकीदारांत चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.
सध्या ९ मालमत्तांनाच आहे सील
पथकाने आतापर्यंत ९५ मालमत्तांना सील ठोकले असून या कारवाईनंतर मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील थकबाकी भरली आहे. अशात त्यांच्या मालमत्ताचे सील काढण्यात आले आहे. मात्र, सध्या ९ मालमत्तांना सील असून यामध्ये ६ दुकान, २ घर व १ गोदाम आहे. संबंधितांकडील करांचा भरणा आल्यावर यांचेही सील उघडून दिले जाईल.
यंदा होणार रेकार्ड ब्रेक वसुली
नगरपरिषद करवसुली पथकाच्या धडाकेबाज वसुलीमुळे यंदा थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. कराचा भरणा करा अन्यथा मालमत्तांची जप्ती हेच धोरण नगरपरिषदेने हाती घेतले आहे. परिणामी आता थकबाकीदार नगरपरिषदेत जाऊन करांचा भरणा करताना दिसत आहे. नगरपरिषदेत आतापर्यंत ५१ टक्के सर्वाधिक करवसुलीचा रेकॉर्ड आहे. मात्र, यंदा जोमात वसुली होत असल्याने जुना रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचे दिसत आहे.