जिल्ह्यातील ९८ सहकारी संस्था अवसायनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:31 AM2021-03-23T04:31:06+5:302021-03-23T04:31:06+5:30
गोंदिया : बेरोजगार, मजूर सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांना सहकार उपनिबंधक कार्यालयाकडे नोंदणी करून संस्थेचे नियमित लेखा परीक्षण करणे ...
गोंदिया : बेरोजगार, मजूर सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांना सहकार उपनिबंधक कार्यालयाकडे नोंदणी करून संस्थेचे नियमित लेखा परीक्षण करणे अनिवार्य आहे. मात्र जिल्ह्यातील ९८ संस्थानी याचे उल्लघंन केल्याने त्यांच्यावर सहकार उपनिबंधक कार्यालयाने अवसायनात काढण्याची कारवाई केली आहे.
एकमेकास साहाय्य करून अवघे धरू सुपंथ हा सहकाराचा नारा आहे. एकेकाळी जिल्ह्यातील सहकार क्षेत्र सुद्धा बळकट होते. मात्र अलीकडे अवकाळा आली आहे. सहकारी दुग्ध संघ, बेरोजगार, मजूर सहकारी संस्था या केवळ नाममात्र राहिल्या आहे. यात राजकारणाचा शिरकाव झाला असल्याने त्या केवळ मोजक्याच लोकांच्या फायद्याच्या राहिल्या आहेत. त्यामुळेच सहकार चळवळ काहीशी डबघाईस आली आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण १०७१ नाेंदणीकृत सहकारी संस्था आहेत. सहकार विभागाच्या नियमानुसार या संस्थाना नियमित लेखा परीक्षण करणे, संस्था सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती देणे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार कामकाज न करणाऱ्या तसेच नियमाचे उल्लघंन करणाऱ्या ९८ संस्थांवर सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने अवसायनाची कारवाई केली आहे. यात प्रामुख्याने बेरोजगारी, मजूर सेवा सहकारी संस्था आदींचा समावेश आहे.
...........
चार पतसंस्थांचा घोळ उघडकीस
तिरोडा तालुक्यातील जागृती सहकारी पतसंस्थेच्या केलेल्या लेखा परीक्षणात जवळपास ३ कोटी ५० लाख रुपयांचा घोळ झाल्याचे पुढे आले होते, तर जिल्ह्यातील इतर तीन सहकारी संस्थामधील घोळ पुढे आला होता. सध्या या संस्थांची चाैकशी सुरू असून, त्यांच्यावर फौजदारी कारवाई सुद्धा करण्यात आली आहे.