फुली मारुन मतदान करण्याचा आनंद आगळाच; १०७ वर्षीय आजोबांनी सांगितल्या निवडणुकीच्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2024 09:43 AM2024-04-04T09:43:44+5:302024-04-04T09:45:57+5:30
१०७ वर्षांचे असलेले जयराम हांडेकर यांचा आवाज आजही कडक आहे. मात्र, त्यांना ऐकायला कमी येते.
अमरचंद ठवरे, लोकमत न्यूज नेटवर्क, बोंडगावदेवी : पूर्वी निवडणूक जाहीर होताच गावातील पानटपरीवर खास चर्चा रंगायच्या. गल्लोगल्लीत कर्ण कर्कश आवाजाने निवडणुकीची रणधुमाळी राहायची. पूर्वी उमेदवार, तसेच त्यांचे सक्रिय सहकारी प्रत्यक्षात भेट घ्यायचे. गावात विकासाची गंगा आणू, नवनवीन बांधकामे करून गाव सुजलाम् सुफलाम् करू, असे लाऊड स्पीकरच्या भोंग्यातून सांगायचे. फुली मारून मतदान करण्यात तेव्हा एक आगळावेगळा आनंद असायचा.
पूर्वी गाव पातळीवरील लोकांच्या बैठका, गप्पा चालायच्या, पण हल्लीच्या निवडणुकीत तसे काही दिसत नाही. यापूर्वी झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मी मतदान केले आहे. मतदान करताना आजपर्यंत कोणतीही अपेक्षा ठेवली नव्हती. यावेळी मी घरूनच मतदान करणार असल्याचे बोंडे नवेगावबांध येथील १०७ वर्षांचे आजोबा जयराम किसन हांडेकर यांनी सांगितले.
ती निवडणूक कशी विसरणार
पूर्वीच्या निवडणुका अत्यंत चुरसपूर्ण व्हायच्या. विविध पक्षाचे उमेदवार गावागावांत पोहोचायचे. आता उमेदवारांचे दर्शन होणे दुर्मिळ झाले. १०७ वर्षीय आजोबांना ऐकायला कमी येत असले, तरी पूर्वीच्या राजकीय पक्षांचे चिन्ह आजही त्यांच्या तोंडपाठ आहेत. पूर्वी फुल्या मारून मतदान करायचे, उमेदवारांच्या चिन्हाचे बिल्ले खास आकर्षित असायचे.
आजोबा, तुम्हाला काय वाटते?
१०७ वर्षांचे असलेले जयराम हांडेकर यांचा आवाज आजही कडक आहे. मात्र, त्यांना ऐकायला कमी येते. निवडणुकीबाबत ते म्हणाले की, निवडून कुणीही येऊ. परंतु गावात नवीन सुधारणा कराव्या. आपण आपले कर्तव्य समजून गाव पातळीपासून ते पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या प्रत्येक निवडणुकीत मतदान केल्याचे त्यांनी सांगितले, मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
मी घरूनच मतदान करणार
१०७ वर्षीय आजोबांना आता खाटेवरच राहावे लागत आहे. माझी मुलं मतदान करण्याची व्यवस्था करतील, यावेळी अनुपस्थित मतदार अंतर्गत नावनोंदणी मुलांनी केल्याने मी घरूनच मतदान करणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आत्ताची निवडणूक वेगळी
आताच्या निवडणुकांचे स्वरूप फार वेगळे आहे. पूर्वी वारेमाप पैसा खर्च होत नव्हता. गावातील कार्यकर्ते चिठ्ठ्या लिहून द्यायचे. त्यावेळी कोणतीही अपेक्षा केली जात नव्हती. आज मात्र पाण्यासारखा पैसा निवडणुकीत खर्च केला जातो, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.
नवीन खासदाराकडून अपेक्षा काय?
निवडून येणाऱ्या नवीन खासदारांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे. शेतमालाला उत्पादन खर्चावर भाव मिळावा. विजेचा नियमितपणे पुरवठा करावा. जलसिंचनाच्या सोयीत वाढ करावी. शेतकरी जगला तर देश टिकेल. शेतकऱ्यांना विकासाचे मुख्य केंद्रबिंदू समजून निवडून येणाऱ्या नवीन खासदारांनी प्रामाणिकपणे काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.