बांगड्या विक्रेत्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 12:05 PM2023-07-12T12:05:44+5:302023-07-12T12:06:36+5:30
सीआरपीएफची परीक्षा केली उत्तीर्ण : मुंडीकोटा येथील विवेक कनोजेचे यश
सुरेंद्र भांडारकर
मुंडीकोटा (गोंदिया) : परिश्रमाला जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची जोड दिल्यास निश्चितच फळ मिळते. परिस्थितीचा बाऊ न करता आहे त्या परिस्थितीला दोन हात करून यश कसे पदरात पाडता येईल, हा विचार करणारेसुद्धा बरेच जण जगात आहेत. आपण ठरविलेले ध्येय गाठायचेच हीच खूणगाठ बांधून परिश्रम घेणाऱ्या युवकाने सीआरपीएफच्या पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण करून बांगड्या व मनिहारी सामान घेऊन गावोगावी सायकलने फिरणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे.
विवेक मधुकर कनोजे, रा. मुंडीकोटा, ता.तिरोडा असे पाेलिस उपनिरीक्षक झालेल्या तरुणाचे नाव आहे. सीआरपीएफ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात विवेकने ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी गडचिरोली येथे निवड झाली आहे. विवेक कनोजे सीआरपीएफची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची वार्ता गावात पसरताच गावकरी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांचे घर गाठून त्याचे कौतुक केले.
विवेकचे आई-वडील बांगड्या व मनिहारी सामान गावागावात जाऊन विक्री करतात. सायकल घेऊन मुंडीकोटा परिसरातील खेडे गाव फिरून बांगड्या व मनिहारी सामानाची विक्री करतात. त्यांच्याकडे थोडीफार शेती असून मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. विवेकने सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. विवेकचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जि.प. शाळा मुंडीकोटा येथे झाले. पुढील शिक्षण भंडारा येथे घेतले. त्यानंतर त्यांनी अभ्यास केंद्र नागपूर येथे राहून नियमित अभ्यास केला. आपण ठरविलेले ध्येय गाठायचेच अशी खूणगाठ बांधून परीक्षेची तयारी केली. यात त्याला अखेर यश मिळाले. महात्मा फुले केंद्र नागपूर यांच्याकडून मदत झाल्याचे विवेक कनोजे यांनी सांगितले.
अपयशाने खचू नका, अधिक परिश्रमाची तयारी ठेवा. अलीकडे शहरी भागासह ग्रामीण भागातील युवकाचा कल सुध्दा स्पर्धा परीक्षांकडे वाढत असून यात त्यांना यश सुध्दा येत आहे; पण काही युवक एक-दोन प्रयत्नात अपयश आल्यानंतर निराश होऊन दुसरा मार्ग निवडतात. त्यामुळे युवकांनो अपयशाने खचून जाऊ नका, अधिक परिश्रमाची तयारी ठेवा, नक्कीच यश मिळेल.
- विवेक कनोजे, मुंडीकोटा
गावकऱ्यांनी केले विवेकचे कौतुक
मुंडीकोटा येथील विवेकच्या घरी जाऊन विवेकचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी युवराज राऊत, सुदाम राऊत, सुरेंद्र भांडारकर, चंद्रकांत भांडारकर, अमित राऊत, ग्यानीजी कनोजे, शिवकुमार राऊत, अमित राऊत, ज्योतीस डोंगरे यांनी विवेकचे त्याच्या घरी जाऊन कौतुक केले.
वडील म्हणतात माझ्या कष्टाचे फलित झाले
मी आणि माझी पत्नी आयुष्यभर गावोगावी फिरून बांगड्या व मनिहारी सामान विक्री करण्याचा व्यवसाय करतो; पण वाट्याला आलेले कष्ट आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नयेत, त्याने खूप शिकावे, मोठे अधिकारी व्हावे हीच आपली इच्छा होती. मुलाने सुध्दा आपल्या कष्टाची जाणीव ठेवून परिश्रम घेऊन यश मिळविले. तो पोलिस उपनिरीक्षक झाल्याने खऱ्या अर्थाने माझ्या कष्टाचे चीज झाले आहे.
- मधुकर कनोजे (विवेकचे वडील)