"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 04:27 PM2024-10-13T16:27:32+5:302024-10-13T16:28:27+5:30
"लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे ठरत नाही, दुर्दैवी घटनेतही विरोधकांना खुर्चीचा मोह."
तिरोडा (गोंदिया) : राज्यातील महायुती सरकार हे शेतकरी हितेशी सरकार आहे. शेतकऱ्यांना १२ तास वीज मिळावी, त्यांचे विजेचे बिल माफ व्हावे, कृषी पंपासाठी करावी लागणारी प्रतीक्षा करण्याचा प्रश्न दूर व्हावा यासाठी मागेल त्याला सौरकृषी पंप योजना सुरू केली. एवढेच नव्हे तर गेल्यावर्षी धानाला प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस दिला होता. त्यात यावर्षी वाढ करून २५ हजार रुपये हेक्टरी बोनस दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित कार्यक्रमात दिली.
तिरोडा तालुक्यातील धापेवाडा सिंचन योजना टप्पा-२ साठी ५२१७ कोटी रुपयांचे निधी शासनाने नुकताच उपलब्ध करुन दिला. या कामाचे भूमिपूजन व जलपूजन कार्यक्रम रविवारी (दि.१३) तिरोडा येथील शहीद मिश्रा शाळेच्या पटांगणावर पार पडला. यावेळी ते बोलत होते. ना. फडणवीस म्हणाले धानाला २५ हजार रुपये बोनस मिळावा म्हणून तुमचा वकील म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार आणि धानाला निश्चितच हेक्टरी २५ हजार बोनस जाहीर करणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शेतकऱ्यांची विजेची समस्या नेहमीसाठी दूर व्हावी यासाठी १४ हजार मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना वीज बिलापासून कायमची मुक्ती मिळेल. महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर असताना केवळ शेतकऱ्यांच्या योजनांना कात्री लावण्याचे काम केले; पण महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक योजना राबवून निधी दिल्याचे सांगितले. आ. विजय रहांगडाले यांनी या क्षेत्रात सिंचनासाठी मोठा निधी खेचून आणला असून यामुळे हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पाणीदार आमदार असल्याचे सांगितले.
🕝 दु. २.२५ वा. | १३-१०-२०२४📍 गोंदिया.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 13, 2024
LIVE | कर्तव्यपूर्ति जन आशीर्वाद महासम्मेलन#Maharashtra#Gondiahttps://t.co/bcw6vLaFB1
यावेळी आ. विजय रहांगडाले यांनी या विधानसभा क्षेत्रातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकत त्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खा. सुनील मेंढे, माजी आमदार राजेंद्र जैन, आ. परिणय फुके, माजी आ. हेमंत पटले व पदाधिकारी उपस्थित होते.
लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे ठरत नाही
महायुती सरकारने लाडकी बहीण व राबविलेल्या इतर योजनांमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोटदुखी होत आहे. ते या योजना बंद करण्यासाठी धडपड करीत आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यास महायुती सरकारने घेतलेले निर्णय रद्द करू असे सांगत आहे; पण ते केवळ जनतेची दिशाभूल करीत आहे. महाविकास आघाडी ही लबाडखोर असून लबाडांचे आवतन जेवल्याशिवाय खरे होत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दुर्दैवी घटनेतही विरोधकांना खुर्चीचा मोह
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिध्दीकी यांची गोळ्या झाडून आरोपींनी हत्या केली. यात सिध्दीकी यांचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना आहे. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून इतरही आरोपींना लवकरच अटक केली जाईल. पोलिस या प्रकरणाचा योग तपास करीत आहे. विरोधक माझ्या राजीनाम्याची मागणी करीत आहे. यातूनच विरोधकांना किती खुर्चीचा मोह आहे दिसून येते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.