शेतात जाण्यासाठी मनाई केल्यामुळे शेतकऱ्याने केली आत्महत्या
By नरेश रहिले | Published: May 8, 2023 06:22 PM2023-05-08T18:22:29+5:302023-05-08T18:22:57+5:30
Gondia News देवरी तालुक्याच्या शिलापूर येथील पोवारीटोला येथे राहणाऱ्या बळीराम जीवन बघेले (५५) या शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी गावातीलच ६ जणांनी मनाई केली. या जाचाला कंंटाळून त्यांनी विष प्राशन करून १३ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली.
नरेश रहिले
गोंदिया : देवरी तालुक्याच्या शिलापूर येथील पोवारीटोला येथे राहणाऱ्या बळीराम जीवन बघेले (५५) या शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी गावातीलच ६ जणांनी मनाई केली. शासकीय कालव्याच्या जमिनीवर रस्ता होता, परंतु तो रस्ता आरोपींनी अतिक्रमणात घेतला आणि शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यापर्यंतची पाळी आणली. या अमानुष कृत्य करणाऱ्या पोवारीटोला शिलापूर येथील ६ जणांवर देवरी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
बळीराम जीवन बघेले (५५) रा. शिलापूर असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. बळीराम बघेले यांची शेती शिलापूर येथील गट क्रमांक ४०१/१/ अ या शेतावर ते वर्षानुवर्षांपासून शासकीय कालव्याच्या पाळीने जात होते. शासकीय कालव्याची पाळ रस्ता म्हणून ते वापरत होते. परंतु आरोपी नेपालचंद महादेव टेंभरे (६६) व उमेश नेपालचंद टेंभरे रा. देवरी यांनी त्या रस्त्यावर अतिक्रमण करून त्यांना शेतावर जाण्यासाठी मनाई केली. त्या शासकीय पाळीवर आरोपींनी अतिक्रमण केल्यामुळे बळीराम यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे त्यांनी तळ्याच्या वाळीवरून नवीन रस्ता तयार केला आणि येणे जाणे सुरू केले. परंतु या नवीन रस्त्यावरूनही आरोपी रामचंद्र अंताराम बोपचे (६५), सुनील रामचंद्र बोपचे (३०), प्रदीप रामचंद्र बोपचे (२८) व दिलीप रामचंद्र बोपचे (३३) सर्व रा. पोवारीटोला शिलापूर यांनीसुद्धा या रस्ता अडवून त्यांना या ठिकाणातून येणे-जाणे करण्यास मनाई केली.
पारंपरिक माझी शेती असून मला शेतात जाण्यास जागा नाही, आरोपी त्यांच्याशी वारंवार वाद घालत होते. त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देत होते. या जाचाला कंंटाळून बळीराम बघेले यांनी विष प्राशन करून १३ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. या घटनेसंदर्भात देवरी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाच्या तपास पोलिस हवालदार ज्ञानीराम करंजेकर यांनी केला आहे. चौकशीत हे सहा लोक आरोपी निष्पन्न झाल्याने त्या आरोपींवर ७ मे रोजी भादंविच्या कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे करीत आहेत.