बहिणीशी प्रेमसंबंध जुळवले म्हणून मित्राला भोसकले, अवघ्या तासाभरात आरोपींना अटक
By नरेश रहिले | Published: November 27, 2023 07:34 PM2023-11-27T19:34:27+5:302023-11-27T19:35:01+5:30
ही घटना २७ नोव्हेंबरच्या पहाटे २ वाजता आंबेडकर चौक, गोंडीटोला रोड कुडवा येथे घडली.
गोंदिया : माझ्यासोबत मित्र म्हणून राहिला आणि माझ्याच बहिणीशी प्रेमसंबध जुळवले म्हणून रागात आलेल्या एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चाकूने भोसकून खून केला. ही घटना २७ नोव्हेंबरच्या पहाटे २ वाजता आंबेडकर चौक, गोंडीटोला रोड कुडवा येथे घडली. प्रज्वल अनिल मेश्राम (२०) रा. आंबेडकर वाॅर्ड, कुडवा ता. गोंदिया असे मृतक तरुणाचे नाव आहे, तर संकेत अजय बोरकर (२०) व आदर्श बाबूलाल भगत (२१) दोन्ही रा. कन्हारटोली, गोंदिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुडवा येथील अजित सुनील गजभिये (२४) याने रामनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार प्रज्वल मेश्राम हा आपला मावस भाऊ अजित गजभिये याच्या सोबत असतांना प्रज्वलचा मित्र आरोपी संकेत अजय बोरकर (२०) व आदर्श बाबूलाल भगत (२१) दोन्ही रा. कन्हारटोली, गोंदिया यांनी त्याला चाकूने भोसकून त्याचा खून केला. मृतक प्रज्वल मेश्राम याचे आरोपी संकेत बोरकर याच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. ही गोष्ट संकेतला मान्य नव्हती. याच कारणावरून प्रज्वलच्या घरी जाऊन प्रज्वलला घराबाहेर बोलावून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आदर्श भगत याने प्रज्वलला पकडून ठेवले तर आरोपी संकेत बोरकर याने त्याच्या हातातील चाकूने वार करून प्रज्वलचा खून केला. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच रामनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून अवघ्या एका तासात गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेऊन गुन्ह्याची उकल केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात रामनगरचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक बस्तवाडे, पोलिस उपनिरीक्षक सोनवणे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रहमतकर, पोलिस हवालदार भगत, राजेश भुरे, चव्हान, कपिल नागपुरे यांनी केले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक बस्तवाडे करीत आहेत.
खुनातील आरोपी रेकॉर्डवरील
प्रज्वलचा खून करणारे आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत. आरोपी संकेत अजय बोरकर (२०) याच्या पाठीवर पाच जखमा आहेत. त्याला उपचाराकरिता नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. आरोपी आदर्श बाबूलाल भगत (२१) याच्या पायावर घटनेमुळे दुखापत झाली आहे. त्याच्यावर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. आरोपी हा सध्या रामनगर पोलिसांच्या ताब्यात आहे.
प्रज्वलला मारण्याची धमकी देत होता
सावत्र आई व सावत्र भाऊ यांच्याशी प्रज्वलचे पटत नसल्याने तो अजित गजभिये यांच्या घराच्या बाजूला असलेल्या स्वत:च्या घरी राहत होता. संकेतच्या बहिणीसोबत प्रज्वलचे प्रेमसंबध असल्याने तो त्याला मारण्याची धमकी देत होता.
पेट्रोलचा बहाणा करून प्रज्वलला उठविले
संविधान दिनाचा कार्यक्रम पाहून रात्री १२:३० वाजता घरी पोहोचलेला प्रज्वल झोपला असताना पहाटे २ वाजताच्या सुमारास एका दुचाकीवर आलेल्या आरोपींनी प्रज्वलच्या दाराला ठोठावले. यावेळी अजितने दार उघडले. आमच्या गाडीचे पेट्रोल संपले, प्रज्वलला उठव असे म्हटले असता पेट्रोलसाठी प्रज्वलला उठविण्यात आले. परंतु पेट्रोलचा बहाणा करून त्याच्याशी वाद करून त्याचा खून केला.
चाकू भोसकून पळत सुटल्याने मारला दगड
आरोपीच्या पॅंटमध्ये खोचलेला चाकू काढून प्रज्वलच्या पोटात खुपसला. त्यामुळे प्रज्वल जखमी होऊन दूर जाऊ लागला. संकेत व आदर्श ऊर्फ बाबू दोघेही मोटारसायकल एम.एच.३१ ई व्ही २४१९ ने पळून जात असताना अजित गजभिये याने घाबरून रोडवर पडलेला दगड संकेत व आदर्शच्या दिशेने फेकून मारला. तो दगड त्यांना लागताच गाडीवरून घसरून ते दोघेही रोडवर खाली पडले. ते जमिनीवर पडताच ओरडू लागल्याने भांडणाचा आवाज ऐकून आजूबाजूचे मनीष भालाधरे, आदर्श हेमने, शुभम व इतर काही लोक जमले होते. लगेच आदर्श सुनील गजभिये याच्या मदतीने प्रज्वलला मोटारसायकल एमएच ३५ एक्यू १७९० वर बसवून खासगी रुग्णालयात नेले. परंतु तेथे दाखल न करताना त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्याचा सल्ला दिला. परंतु तेथे नेताच डॉक्टरांनी मृत घोषित केले.