सराईत गुन्हेगारांच्या टोळीला 2 महिन्यांकरिता जिल्ह्याबाहेर केले तडीपार
By अंकुश गुंडावार | Published: July 20, 2023 11:11 AM2023-07-20T11:11:35+5:302023-07-20T11:13:39+5:30
गुन्हेगारांचे धाबे दणाणले
गोंदिया : पोलीस अधीक्षक यांचे आदेशानुसार तिरोडा तालुक्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला 2 महिन्यांकरिता गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आले.
तिरोडा पोलिस ठाणे परिसरातील सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख संजय सोवींदा बरीयेकर व त्याच्या टोळीविरुद्ध पोलीस ठाणे तिरोडा येथे मोहाफुलाची अवैध दारू गाळून विक्री करण्याचे गुन्हे दाखल आहेत. हे सर्व सराईत गुन्हेगार सवयीचे मगरुर व धाडसी प्रवृत्तीचे आहेत. या सर्वांच्या अवैध कृतीमुळे तिरोडा परीसरातील सर्वसामान्य नागरिकांचे मनात दहशत निर्माण झालेली असून लोकांचे सार्वजनिक स्वास्थ्यास धोका निर्माण झाला असल्याने सर्वसामान्य व्यक्ती त्यांचेविरुद्ध उघड साक्ष देण्यास पुढे येत नाही.
पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध वारंवार कारवाई करून सुध्दा त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. या गुन्हेगारांच्या कृत्यांमुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने त्यांचेविरूद्ध पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे तिरोडा यांनी त्यास गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करणे करीता कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा यांचे मार्फतीने मंजुरीस्तव सादर केला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे, उपविभागीय पोलिस यांनी विहीत मुदतीत सदर हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून या गुन्हेगारास गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती.
या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, निखील पिंगळे, पोलीस यांनी मोहाफुलाची अवैध दारू गाळून विक्री करणारा टोळी प्रमुख सराईत गुन्हेगार नामे संजय सोविंदा बरियेकर, वय 35 वर्षे, रा.सिल्ली, त. तिरोडा यास व त्याचे टोळीतील सदस्य 1) निलेश्वरपुरी नागापुरी गांगदर्याव, वय 26, रा. सिल्ली, 2) दिगंबर आसाराम भलावी, वय 58 वर्षे, रा.बोरगाव, 3) स्वप्नील हंसराज मेश्राम, वय 31 वर्षे, रा.भिवापूर, 4) सत्यशील चिंधुजी बंसोड, वय 34 वर्षे, रा. ठाणेगाव, 5) अंकुश प्रकाश येशने, वय 23 वर्षे, रा.भूतनाथ वार्ड तिरोडा या सर्वांना 2 महिन्यांकरिता गोंदिया जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात येत असल्याबाबतचा हद्दपार आदेश पारीत केलेला आहे. उपरोक्त हद्दपार आदेश पोलीस ठाणे तिरोडा मिळाले आहे.
गोंदिया जिल्हा पोलीस दलाने केलेल्या हद्दपार कारवाई मुळे अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.