नागणडोह येथे हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 11:12 PM2022-10-13T23:12:34+5:302022-10-13T23:13:12+5:30

हत्तींचा कळप बुधवारी सकाळी उमरपायली जंगलाच्या दिशेने गेल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. दरम्यान,  रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने नागणडोह येथील वस्तीत धुमाकूळ घातला. या ठिकाणी दहा-पंधरा घरांची वस्ती असून, ३० ते ३५ जण झोपड्या बांधून राहतात. दरम्यान, रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने हल्ला करून झोपड्यांची नासधूस केली. काही झोपड्यांच्या भिंतीदेखील पाडल्या. तर घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान केले. 

A herd of elephants in Naganadoh | नागणडोह येथे हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ

नागणडोह येथे हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जंगल परिसरातच हत्तींचा मुक्काम असून, बुधवारी (दि. १२) रात्रीच्या सुमारास केशोरीपासून १२ किमी अंतरावरील नागणडोह येथे हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून झोपड्यांचे व सामानाचे मोठ्या प्रमाणात  नुकसान केले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे वस्तीतील नागरिकांमध्ये  भीतीचे  वातावरण  निर्माण झाले होते. येथील ३० ते ३५ नागरिकांना तिडका येथे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. 
प्राप्त माहितीनुसार, हत्तींचा कळप बुधवारी सकाळी उमरपायली जंगलाच्या दिशेने गेल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. दरम्यान,  रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने नागणडोह येथील वस्तीत धुमाकूळ घातला. या ठिकाणी दहा-पंधरा घरांची वस्ती असून, ३० ते ३५ जण झोपड्या बांधून राहतात. दरम्यान, रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने हल्ला करून झोपड्यांची नासधूस केली. काही झोपड्यांच्या भिंतीदेखील पाडल्या. तर घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान केले. 
ही घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या वस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी या घटनेची माहिती या वस्तीतील लोकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच गोठणगाव वनविभागाचा स्टॉप, आरआरटी पथक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्याला सुरुवात केली. 
वस्तीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून येथील नागरिकांना बोरटोला येथे हलविण्यात आले आहे. हत्तींचे या परिसरात वास्तव्य असेपर्यंत या नागरिकांची बोरटोला येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हत्तींचा नागणडोह परिसरात मुक्काम 
मागील पंधरा दिवसांपासून हत्तींचा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जंगल परिसरातच मुक्काम आहे. बुधवारी या हत्तींच्या  कळपाने उमरपायली परिसरातील धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर या हत्तींनी आपला मोर्चा नागणडोह परिसराकडे वळविला आहे. बोरटोला परिसरात हत्तींच्या कळपाचे वास्तव्य असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

वन विभागाचे पथक डेरेदाखल 
- नागणडोह येथे हत्तींनी धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. १३) सकाळी उघडकीस आला. यानंतर वनविभागाचे ५० कर्मचाऱ्यांचे पथक नागणडोह येथे दाखल झाले आहे. तसेच आरआरटी पथकसुद्धा या ठिकाणी पोहोचले आहे. येथील वस्तीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

 

Web Title: A herd of elephants in Naganadoh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.