रानडुकराच्या हल्ल्यात मजूर महिलेचा मृत्यू, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील घटना
By अंकुश गुंडावार | Published: April 20, 2023 01:32 PM2023-04-20T13:32:17+5:302023-04-20T13:32:38+5:30
वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ, नागरिकांत भीतीचे वातावरण
बोंडगावदेवी (गोंदिया) : शेतात मक्याचे कणिस तोडण्यासाठी गेलेल्या मजूर महिलेवर दबा धरुन बसलेल्या रानडुकराने हल्ला करुन गंभीर जखमी केले. यात मजूर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.२०) सकाळी ७ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाक्टी येथील शेतशिवारात घडली.
देवलाबाई राजगिरे (५०) रा. बाक्टी असे रानडुक्कराच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मजूर महिलेचे नाव आहे. सध्या उन खूप असलेल्या शेतकरी शेतातील कामे पहाटेपासून सकाळी ११ वाजतापर्यंत आटोपून घेत आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या मक्क्याची कणसे तोडण्याचे काम सुरु आहे.
देवलाबाई राजगिरे ही महिला गावातीलच शेतकऱ्याच्या शेतात बुधवारी सकाळी कणसे तोडण्यासाठी मजुरीच्या कामावर गेली होती. दरम्यान कणस तोडत असताना अचानक रानडुकराने देवलाबाईवर हल्ला करुन जखमी केले. शेतात उपस्थित असलेल्या मजुरांनी आरडाओरड करुन रानडुकराला परातवून लावले. यानंतर जखमी देवलाबाईला उपचारासाठी साकोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करुन देवलाबाईची प्रकृती गंभीर असल्याने तिला डॉक्टरांनी भंडारा येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. दरम्यान साकोलीवरुन देवलाबाईला रुग्णवाहिकेने भंडारा येथे नेत असताना वाटेतच तिचा दुपारी १२ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ
जिल्ह्यात उन्हाळी धानासह इतर पिकांची सुध्दा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र मागील काही महिन्यापासून वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.