शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढले सुखरूप बाहेर; नवेगावबांध-कवठा येथील घटना
By अंकुश गुंडावार | Published: December 15, 2023 07:50 PM2023-12-15T19:50:28+5:302023-12-15T19:51:20+5:30
वन विभागाच्या रेस्क्यू चमूची मोहीम यशस्वी
अंकुश गुंडावार, नवेगावबांध (गोंदिया) : नवेगावबांध-कवठा मार्गालगत असलेल्या एका शेतातील विहिरीत रात्रीच्या सुमारास पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू ऑपरेशन करून वन विभागाच्या चमूने सुखरूपपणे काढून जीवनदान दिले. बिबट्याला बाहेर काढल्यानंतर त्याची आरोग्य तपासणी करून त्याला जंगलात सोडून देण्यात आले. ही घटना शुक्रवारी (दि. १५) दुपारी घडली.
प्राप्त माहितीनुसार योगराज आत्माराम टेंभुर्णे यांची शेती नवेगावबांध-कवठा मार्गालगत आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या शेतातील विहिरीत अंदाजे दीड वर्षाचा नर बिबट्या पडला. आत्माराम टेंभुर्णे हे शुक्रवारी सकाळी शेतात औषधफवारणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, फवारणी करण्यासाठी ते विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले असता विहिरीत बिबट्या पडला असल्याचे आढळले. त्यांनी व लगतच्या शेतकऱ्यांनी याची माहिती लगेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. माहिती प्राप्त होताच वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली.
वनविभागाच्या रेस्क्यू टीमने रेस्क्यू मोहीम राबवून शुक्रवारी (दि. १५) दुपारी २:१५ वाजता बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी, एस. जी. अवगान, क्षेत्र सहायक कवठा एम.आर.चौधरी, बीट रक्षक एम.झेड.कुंभरे कवठा-१, बीटरक्षक कवठा-२, एस.एम.बरय्या, बीटरक्षक कवठा-३ एम. टी.चव्हाण, बीटरक्षक कवठा-४,ए.ए.परतेती, रेस्क्यू चमू उपस्थित होती.