दिव्यांग बांधवांसाठी ३ डिसेंबरपर्यंत नविन धोरण, बच्चू कडूंची ग्वाही
By अंकुश गुंडावार | Published: August 17, 2023 06:11 PM2023-08-17T18:11:28+5:302023-08-17T18:13:23+5:30
दिव्यांग प्रमाणपत्र वितरणासाठी अभियान राबविणार
गोंदिया : यापूर्वी दिव्यांग बांधवांची सुनावणी होत नव्हती पण आता दिव्यांग बांधवांच्या तक्रारींकरिता संपूर्ण जिल्हा व महाराष्ट्र राज्यभर मी फिरतो आहे, फिरणार आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या तक्रारींतून नविन धोरण आम्ही तयार करणार आहोत. ३ डिसेंबरपर्यंत नविन धोरण राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी आणणार असल्याची ग्वाही दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष तथा आ. बच्चू कडू यांनी सांगितले.
गोंदिया येथे जिल्हा समाज कल्याण विभागातर्फे आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान कार्यक्रम गुरुवारी (दि.१७) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी ते गोंदिया येथे आले असताना पत्रकारांसह ते बोलत होते. आ. बच्चू कडू म्हणाले, महाराष्ट्रभर या संदर्भात दौरे करित असतांना एक बाब प्रकर्षाने जाणवली की कोणत्याही जिल्ह्यात तालुक्याला दिव्यांग मंडळ नाही. त्यामुळे दिव्यांग बांधवांना जिल्हा कार्यालयाला येवून प्रमाणपत्र घ्यावा लागते.
सध्या ग्रामीण रूग्णालयात प्रमाणपत्र देता येत नाही. जिल्हा कार्यालयातूनच ती व्यवस्था आहे. जास्तीत जास्त उपजिल्हा रूग्णालयातून ती व्यवस्था करता येईल. या संदर्भात जि.प.चे सीईओ आणि जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून शिबीरातून किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रमाणपत्र वितरण करता येईल. एका महिन्यापुरते प्रमाणपत्र वितरण करण्याचे अभियान याकरिता राबविण्यात येणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
शरद पवार व अजित पवार यांच्या भेटीबाबत बोलणे टाळले
शासन आपल्या दारी तसेच दिव्यांग आपल्या दारी या युती शासनाच्या योजनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे या योजनेवरून युतीशासनाला जुमले सरकार म्हणून हिणवतात यावर आ. बच्चू कडू म्हणाले की जुमले असोत की आणखी काही असो, सरकार काम तर करित आहे. घरी बसून तर काम होत नाही असे सांगितले. खा.शरद पवार, ना. अजित पवार यांच्या पुण्यातील भेटी संदर्भात माध्यमांनी विचारले असता मी आज दिव्यांग बांधवाच्या कार्यक्रमाला आलेलो आहे. या संदर्भात काय ते विचारा म्हणत इतर प्रश्नांची उत्तरे देण्यास त्यांनी टाळले.