बॅटरी चोरीच्या संशयातून पोलीस शिपायाच्या भावाचा खून; दोघांवर गुन्हा दाखल
By नरेश रहिले | Published: October 19, 2022 06:45 PM2022-10-19T18:45:05+5:302022-10-19T18:45:44+5:30
बॅटरी चोरी केल्याच्या संशयावरून पोलीस शिपायाच्या भावाची हत्या करण्यात आली आहे.
गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाण्यांत कार्यरत पोलीस शिपायाच्या भावाला बॅटरी चोरी केल्याच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.४० वाजता रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आंबेडकर चौक कुडवा येथे घडली. भुमेंद्र लिलाधर मेश्राम (३२) रा. कुडवा असे मृताचे नाव आहे.
बोलेरोत बसवून नेलं बिअर शॉपीच्या दुकानात
रावणवाडी पोलीस ढाण्यात कार्यरत पोलीस शिपाई नरेंद्र लिलाधर मेश्राम (३६) यांनी रामनगर पोलीसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा लहान भाऊ भुमेंद्र लिलाधर मेश्राम (३२) रा. कुडवा हा १५-२० दिवसापासून मनिष मिताराम बघेले (३४) रा. कुडवा याच्याकडे वायफाय केबल कनेक्शनचे काम मजुरीने करीत होता. बॅटरी चोरीचा संशय घेत आरोपी मनिष बघेले व भावीन पारधी रा. कुडवा यांनी सायंकाळी ४.४० वाजता आंबेडकर चौक कुडवा येथे लाथाबुक्यांनी, थापडांनी, ढकलत ढकलत मारपीट केली. यात भुमेंद्र लिलाधर मेश्राम (३२) चा मृत्यू झाला आहे. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३६४, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कुरसुरी करीत आहेत. आरोपी मनिष बघेले व भावीन पारधी याच्या सोबत जबरदस्तीने भुमेंद्रला आपल्या बोलेरो एमएच ३५ पी ४०९८ मध्ये बसवून बियर शॉपीच्या दुकानात घेवून गेला. त्याला तेथेही मारहाण केली.
दिराच्या मृत्यूची बातमी वहिणीला दिली
या प्रकरणातील तक्रारकर्ते पोलीस शिपाई नरेंद्र मेश्राम (३६) यांनी आपल्या पत्नीला फोन करून आपला लहान भाऊ घरी आला का याची विचारणा केल्यावर त्यांनी तो आला नाही असे सांगितले. काही वेळाने संगीता मेश्राम यांनी नरेंद्र यांना दोन इसम घरी आले आणि भुमेंद्रच्या मृत्यू झाल्याची बातमी दिल्याचे सांगितले.