नवेगावबांधमध्ये आढळला दुर्मीळ सायटोड्स फस्का कोळी; महाराष्ट्रातील पहिलीच नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 11:18 AM2022-10-12T11:18:19+5:302022-10-12T11:21:57+5:30
लवकरच दस्तऐवज प्रकाशित करणार
संतोष बुकावन
अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : सायटोड्स फस्का ही अत्यंत दुर्मीळ स्पायडर प्रजाती महाराष्ट्रात प्रथमतःच गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध कृषी संशोधन केंद्र येथे आढळली आहे. या प्रजातीच्या कोळ्याची महाराष्ट्रात पहिल्यांदाच नोंद झाली आहे. त्याबाबत वैज्ञानिक दस्तऐवज लवकरच प्रकाशित केले जाणार आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील वनाच्छादित प्रदेश असंख्य जैवविविधतेने संपन्न आहे. प्रा. डॉ. गोपाल पालिवाल, प्रा. डॉ. सुधीर भांडारकर यांनी अनेक संशोधनपर लेखांतून जैवविविधता प्रकाशझोतात आणली आहे. त्यांनी नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून सायटोड्स फस्का कोळ्याची प्रजाती महाराष्ट्रात असल्याची पहिली नोंद त्यांनी केली आहे. त्यांच्या या संशोधनाने गोंदिया जिल्ह्यात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या प्राध्यापकांनी अनेक वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यातील कोळ्यांच्या प्रजातीतील वैविध्यावर काम केले आहे. त्यांनी या आधीच १६ जातीतील एकूण २० कोळी प्रजातींची नोंद केली आहे. आणखी सुमारे १० पेक्षा अधिक कोळी या यादीत जोडले जातील, असा विश्वास ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
हे कोळी सायटोडीडी कुटुंबातील असून, सायटोड्स फस्का वॉल्केनिअर म्हणून त्यांची ओळख पटली आहे. तो नवेगावबांध कृषी संशोधन केंद्रातील इमारतीत अडगळीच्या सामानात दिसून आला. अमरावती विद्यापीठातील कोळीतज्ज्ञ डॉ. अतुल बोडखे यांनी या ओळखीची पुष्टी केली आहे. तसे हा कोळी शोधणे कठीण असते. तो अनेकदा छोटे छिद्र, खड्ड्यात राहतो. प्रामुख्याने तो निशाचर असून, तो गडद रंगाच्या सानिध्यात असतो. निरीक्षणात हा कोळी प्रौढ मादा असल्याचे समजले. तिचे अंडकोष पायांच्या साहाय्याने पोटाच्या बाजूला धरून ठेवते आणि पालकत्वाची भूमिका बजावते. कुठलाही त्रास झाला तरी ते तिचे अंडकोष स्वतःपासून वेगळे होऊ देत नाही. या कोळीस ‘स्पिटिंग स्पायडर’ असेही म्हणतात.
देशभरात आढळतात १० प्रजाती
आयसीएआर-नॅशनल ब्युरो ऑफ अग्रिकल्चरल इन्सेक्ट रिसोर्सेस बेंगळुरूच्या शास्त्रज्ञाच्या अलीकडील अहवालानुसार जगातील सायटोड्सच्या २२५ प्रजातींपैकी केवळ १० प्रजाती भारतात आढळतात. त्यांच्या मते, आजपर्यंत हे कोळी फक्त आसाम, ओडिशा, निकोबार बेट, ग्रेव्हली-चेन्नई, कलकुर्ची, नमक्कल-तामिळनाडू आणि आयसीएआर-एनबीएआयआर कॅम्पस बेंगळुरू कर्नाटक येथून नोंदवले गेले आहे. आता गोंदिया जिल्हा (महाराष्ट्र) अशी नोंद या यादीत होईल. जिल्ह्यातील या कोळी संशोधनाबद्दल कौतुक केले जात आहे.