चप्पल-जोडे शिवणाऱ्या पित्याच्या कष्टाचे लेकीने फेडले पांग, बनणार पोलिस उपनिरीक्षक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 11:45 AM2023-07-06T11:45:40+5:302023-07-06T11:46:13+5:30

खुशबुचा सुगंध दरवळला : एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण

A shoemaker's daughter will become a sub-inspector of police; qualified mpsc exam | चप्पल-जोडे शिवणाऱ्या पित्याच्या कष्टाचे लेकीने फेडले पांग, बनणार पोलिस उपनिरीक्षक 

चप्पल-जोडे शिवणाऱ्या पित्याच्या कष्टाचे लेकीने फेडले पांग, बनणार पोलिस उपनिरीक्षक 

googlenewsNext

संताेष बुकावन/ अमरचंद ठवरे

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : जीवनात कोणत्याही ध्येय प्राप्तीसाठी मनात प्रचंड आत्मविश्वास, जिद्द असणे आवश्यक आहे. अठराविश्वे दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या खुशबू प्रल्हाद बरैय्या या २५ वर्षीय युवतीने स्पर्धात्मक परीक्षेचे कोणतेही वर्ग न लावता गावामध्ये राहून नियमित अवांतर अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. तिच्या अथक परिश्रमाला यश येऊन चप्पल-जोडे शिवणाऱ्याची मुलगी खुशबू आता पोलिस उपनिरीक्षक होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ मुख्य परीक्षा २०२० अंतर्गत पोलिस उपनिरीक्षकपदाची तात्पुरती निवड यादी मंगळवारी (दि. ४) जाहीर करण्यात आली. त्यात अर्जुनी मोरगाव येथील खुशबू प्रल्हाद बरैय्या या २५ वर्षीय युवतीने ३६४ गुण मिळवून पोलिस उपनिरीक्षक पदावर आपले स्थान निश्चित केले. खुबशूच्या या असामान्य यशाबद्दल तिचे कौतुक केले जात आहे. खुशबू प्रल्हाद बरैय्या, रा. अर्जुनी मोरगाव असे त्या युवतीचे नाव आहे.

प्रल्हाद बरैय्या हे तालुक्याच्या ठिकाणी लहानसे दुकान थाटून चप्पल, जोडे शिवण्याचे काम करतात. प्रधानमंत्री आवास योजना शहरीअंतर्गत लाभ मिळालेल्या दोन खोल्यांच्या झोपडीवजा घरात पत्नी, एक मुलगा, दोन मुली यांच्यासह राहतात. प्रल्हाद बरैया आपल्या कुटुंबाचा गाडा चालवितात. प्रल्हाद यांनासुद्धा शिक्षणाची आवड आहे. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. शिक्षणापासून प्रगती नाही याची जाण त्यांना वेळोवेळी होत असल्याने त्यांनी तिन्ही मुलांच्या शिक्षणात कोणतीही उणीव भासू दिली नाही. आपले मुले शिक्षण घेऊन शासकीय पदावर कार्यरत राहावे, अशी त्यांची अपेक्षा होती. प्रल्हाद बरैय्या यांची पत्नी उर्मिला या प्रकृती बरी नसल्याने संपूर्ण कुटुंबाची सर्वतोपरी जबाबदारी एकट्या प्रल्हाद बरैय्या यांच्यावर आहे. मुलांनी शिकावे, अशी त्यांची प्रबळ इच्छा असल्याचे त्यांच्याशी संवाद साधल्यावर जाणवले.

तिन्ही मुलांच्या शिक्षणासाठी वडिलांनी घेतले कष्ट

घरामध्ये अठराविश्वे दारिद्र्य, प्रशस्त अशी अभ्यासासाठी सोय नसतानासुद्धा झोपडीवजा घरातील दिवा ‘खुशबू’च्या रूपाने मात्र ताऱ्याप्रमाणे चकाकला. जन्मदात्या मायबापाच्या प्रयत्नाला तिघाही मुलांनी कुठेही गालबोट लागू दिले नाही. स्वत: कष्ट उपसून, त्रास भोगून प्रल्हाद बरैय्या यांनी तिन्ही मुलांच्या शिक्षणासाठी चप्पल, जोडे पॉलीश, दुरुस्तीचे काम करून पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिक्षित करण्याचा ध्यास घेतला.

अवांतर वाचनाने यशाला गवसणी

स्पर्धात्मक परीक्षेचे कोणतेही वर्ग न लावता एमपीएससीसाठी शहरात जाऊन अभ्यास वर्गाचा आग्रह केला नाही. घरामध्ये स्वतंत्र अशी अभ्यासासाठी कोणतीही सोय नाही. सरकारी नोकरी करायची हा एकच ध्यास मनामध्ये अंगीकारून नियमित अभ्यास, अवांतर वाचनाने यशाला गवसणी घालणे सहज शक्य झाल्याचे मनोदय खुशबू बरैय्या हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. खुशबू सुरुवातीपासून अभ्यासात हुशार. सरस्वती विद्यालयातून ७४.६० टक्के गुण घेऊन बारावी उत्तीर्ण झाली. एस.एस.जे. महाविद्यालयातून बीएससी ७६.६७ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण. एमएससी (गणित) २०१९ पासून तीने लोकसेवा आयोग परीक्षेची तयारीला सुरुवात केली. मनात प्रचंड जिद्द, आपले ध्येय गाठले.

वाचनालयात बसून केला अभ्यास

अर्जुनी मोरगाव पोलिस स्टेशनच्या वाचनालयात खुशबूने आपले यशस्वी भविष्य घडविले. नित्यनेम सकाळी आठ वाजता खुशबू वाचनालयात जायची. भाऊ तिला जेवणाचा डबा नेऊन द्यायचा. एकदा सकाळी वाचनालयात गेल्यावर रात्री आठ वाजल्यानंतर खुशबू घरी यायची. वाचनालयामुळे आपल्याला नियमित अभ्यास करायला संधी मिळाल्याचे तिने सांगितले. राज्यसेवेतून वर्ग एकसाठी आपण यापुढे प्रयत्नरत राहणार असल्याचे सांगितले. मुलींनी स्पर्धात्मक परीक्षांकडे वळावे. नियमित अभ्यासाने सहज शक्य असल्याचे खुशबूने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पालकांनो मुलींना शिकवा

मुलींना शिकवलं पाहिजे. माझ्या आई-बाबांनी मला हलाखीच्या परिस्थितीत अपेक्षेपेक्षा अधिक शिक्षण दिले. त्यांना प्रोत्साहन द्या. निश्चितच मुली आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करतात. मी राज्यसेवेच्या उच्च पदासाठी तयारी सुरू केली आहे. मला यात निश्चितच यश लाभेल. मला आई-वडील, माझा भाऊ शुभम मार्कंड बरैय्या, मैत्रिणी निकिता राऊत, रेशमा ठोंबरे यांचे मार्गदर्शन लाभले, असे तिने सांगितले.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: A shoemaker's daughter will become a sub-inspector of police; qualified mpsc exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.