गोंदियातील जवानाचा अरुणाचल प्रदेशातील हिमवृष्टीत मृत्यू; गावावर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 10:35 AM2022-03-24T10:35:23+5:302022-03-24T11:31:28+5:30

हा जवान अरुणाचल प्रदेशातील दिब्रुगड भागात कर्तव्यावर असताना ही घटना मंगळवारी रात्री दोनच्या दरम्यान घडली. महेंद्र यांच्या निधनामुळे चिरेखनी गाव शोकसागरात बुडाले आहे.

a soldier from gondia dies under snow in arunachal pradesh | गोंदियातील जवानाचा अरुणाचल प्रदेशातील हिमवृष्टीत मृत्यू; गावावर शोककळा

गोंदियातील जवानाचा अरुणाचल प्रदेशातील हिमवृष्टीत मृत्यू; गावावर शोककळा

Next
ठळक मुद्देअरुणाचल प्रदेशात होता कर्तव्यावर चिरेखनी गावावर शोककळा

तिरोडा (गोंदिया) : गोंदिया जिल्ह्यातील चिरेखनी येथील जवान कर्तव्यावर असताना अरुणाचलमध्ये जोरदार हिमवृष्टीत सापडून शहीद झाला. मराठा रेजिमेंटमधील महेंद्र भास्कर पारधी (वय ३७) हा जवान अरुणाचल प्रदेशातील दिब्रुगड भागात कर्तव्यावर असताना ही घटना मंगळवारी रात्री दोनच्या दरम्यान घडली. महेंद्र यांच्या निधनामुळे चिरेखनी गाव शोकसागरात बुडाले आहे.

महेंद्र पारधी यांचा जन्म चिरेखनी येथे १९८५ मध्ये झाला. शिक्षणही चिरेखनी व तालुका स्थळ तिरोडा येथे झाले. ते सन २००४ मध्ये बेलगाम मराठा सेंटरमध्ये (कर्नाटक) येथे हवालदारपदी रुजू झाले होते. या पदावरील कर्मचाऱ्यांना २४ वर्षे सेवा द्यावी लागते व त्यानंतर ते सेवानिवृत्त होतात. महेंद्र पारधी यांच्या सेवानिवृत्तीला आठ वर्षे बाकी होते. महेंद्र यांचे पार्थिव गुरुवारी चिरेखनी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अशी घडली घटना...

प्राप्त माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागात महेंद्र पारधी यांच्यासह सहा जवान गस्तीवर होते. दरम्यान, खूप जोरात हिमवृष्टी होत होती. सर्वत्र वातावरण व रस्ते अंधारले होते. सर्वांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. रस्ते सापडत नव्हते. अशात तुफानी व ढगाळ वातावरणात हे सैनिक अडकले होते. त्यातच महेंद्र यांना वीरमरण आले.

माजी आमदार दिलीप बन्साेड, राष्ट्रवादीचे जि. प. सदस्य किरणकुमार पारधी, पोलीस निरीक्षक योगेश पारधी आदींनी शहीद महेंद्र यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.

अशी आहे कौटुंबिक पार्श्वभूमी...

शहीद महेंद्र पारधी यांचे वडील भास्कर पारधी यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. आई चित्रकला पारधी हयात आहेत. महेंद्र यांना तीन भाऊ आहेत. देशसेवेची आवड असल्याने ते सैन्यात दाखल झाले होते. महेंद्र यांच्या पत्नीचे नाव गायत्री असून, त्यांना जानव व शिवाय नावाची दोन मुले आहेत. या चिमुकल्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र कायमचे हरपले आहे. संपूर्ण कुटुंबात शोकाकुल वातावरण आहे. महेंद्र शहीद झाल्याची बातमी कळताच त्यांचे भाऊ सोनू पारधी यांची प्रकृती बिघडली होती.

Web Title: a soldier from gondia dies under snow in arunachal pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.