‘त्या’ वाघिणीचा मुक्काम आता पांगडी जंगलात, सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना 'नो एन्ट्री'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 12:32 PM2023-06-01T12:32:21+5:302023-06-01T12:33:04+5:30
ठिकठिकाणी वनकर्मचारी तैनात
गोंदिया : चंदपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी जंगलातून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या दोन वाघिणींपैकी एक वाघीण प्रकल्पातून भरकटली. सध्या या वाघिणीचे दर्शन गोंदिया, गोरेगाव परिसरात होत आहे. ती वाघीण आता पांगडी जलाशय परिसरात असून, सुरक्षेच्या दृष्टीने पांगडीकडे येणारे सर्व मार्ग पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. तर ठिकठिकाणी वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि वाघिणींची संख्या सम करण्याच्या उद्देशाने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात दोन वाघिणी आणण्यात आल्या. या दोन्ही वाघिणींना २० मे रोजी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते. सोडलेल्या दोन वाघिणींपैकी एक वाघीण गोंदेखारी वन परिसरातून बाहेर निघाली असून, तिने आपला मोर्चा पांगडी जंगलात वळविला. पांगडी येथील तलाव, वन विभागाची रोपवाटिका आणि शिव मंदिर परिसरात त्या वाघिणीचे लोकेशन मिळाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाने अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा पांगडी परिसरात तैनात केला आहे.
पांगडी, धानुटोलाच्या दिशेने येणाऱ्या सर्व मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिसरातील सर्व गावांतील नागरिकांना सुरक्षेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाघीण दिसताच वन विभागाला त्याची माहिती देण्याचे आवाहनदेखील वनविभागातर्फे करण्यात आले आहे.
परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशत
मागील दोन-तीन दिवसांपासून भरकटलेल्या वाघिणीचा वावर पांगडी परिसरात असल्याने या भागातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या खरीपपूर्व हंगामाची कामे शेतात सुरू आहेत. अशात वाघिणीची दहशत असल्याने शेतकरी जीव मुठीत घेऊन शेतात काम करीत असल्याचे चित्र आहे.