‘ए टू झेड महासेल’ आगीत जळून राख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2022 05:00 AM2022-03-20T05:00:00+5:302022-03-20T05:00:21+5:30

सेलमध्ये घरगुती वापराच्या प्लास्टिकच्या वस्तू आणि कपडे होते. त्यामुळे या आगीने रौद्र रूप धारण केले. परिणामी, तब्बल २५ ट्रीपव्दारे रात्री १० वाजताच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सेलमधील एकूणएक वस्तू जळून राख झाली व मालकाचे सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

‘A to Z Mahasel’ burn in the fire | ‘ए टू झेड महासेल’ आगीत जळून राख

‘ए टू झेड महासेल’ आगीत जळून राख

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील श्री टाॅकीज मार्गावर असलेल्या ‘ए टू झेड महासेल’ला शुक्रवारी (दि.१८) धुळवडीच्या दिवशी सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास शाॅर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील संपूर्ण साहित्य जळून राख झाले. ५ तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले. या आगीत सेलमधील ‘ए टू झेड’ वस्तू जळून राख झाल्या आहेत. 
     प्राप्त माहितीनुसार, श्री टॉकीज मार्गावरील बजरंग दल कार्यालयासमोर ‘ए टू झेड महासेल’ लागला असून त्याचे मालक राधेलाल मनिराम बोपचे (रा. गोरेगाव) आहेत. सेल लागलेली इमारत भागवत मसानी व सुधीर मसानी यांच्या मालकीची आहे. शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास दुसऱ्या माळ्यावर असलेला कर्मचारी शुभम आत्राम (रा. अनंतपूर-यवतमाळ) याला शॉर्टसर्किटने आग लागल्याचे दिसले. तो खाली अन्य कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी आला. अन्य कर्मचारी तेथे पोहोचेपर्यंत आग परसली होती. याबाबत लगेच पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. ठाणेदार महेश बनसोडे यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन वाहन लगेच घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने आणि लगतच्या इमारतींना आग लागण्याची शक्यता वाढल्याने गोंदियातील ६ वाहनांसह अदानी वीज प्रकल्प, गोरेगाव, आमगाव व बालाघाट येथील प्रत्येकी अशा एकूण १० अग्निशमन वाहनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. 
सेलमध्ये घरगुती वापराच्या प्लास्टिकच्या वस्तू आणि कपडे होते. त्यामुळे या आगीने रौद्र रूप धारण केले. परिणामी, तब्बल २५ ट्रीपव्दारे रात्री १० वाजताच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सेलमधील एकूणएक वस्तू जळून राख झाली व मालकाचे सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती कळताच घटनास्थळी माजी आ. राजेंद्र जैन, रवी ठकरानी, गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांच्यासह अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. आग आटोक्यात येईपर्यंत या सर्वांनी घटनास्थळीच तळ ठोकला होता.

ते ५ जण सुरक्षित
- ‘ए टू झेड महासेल’ असलेल्या इमारतीला आग लागली तेव्हा तेथे सेलमध्ये काम करणारे शुभम आत्राम, शुभम देठे (रा. यवतमाळ), अभी मुंडे (यवतमाळ), संजय गजभिये (रा. रतनारा-गोंदिया) व सतीश पटले (रा. नवाटोला-गोंदिया) आतमध्ये होते. शुभम आत्राम याला आग लागल्याचे दिसले व त्यानंतर लगेच ते बाहेर पडले. 

...तर बाजारपेठच आगीच्या विळख्यात
‘ए टू झेड महासेल’ इमारतीच्या एका बाजूला मोकळी जागा असून दुसऱ्या बाजूला लागूनच कामाक्षी हॉटेलची इमारत आहे.  आगीने रौद्र रूप धारण केल्याने कामाक्षी हॉटेललासुद्धा धोका होता. शिवाय, यालाच लागून ८-१० दुकानेसुद्धा आहेत. विशेष म्हणजे, आगीचा भडका एवढा जास्त होता की, समोरच्या इमारतीलाही धोका होता. विशेष म्हणजे, आगीच्या उष्णतेमुळे तेथे रस्त्यावर उभ्या एका चारचाकी वाहनातून धूर निघत असल्याचेही कळले. अशात आग वेळीच आटोक्यात आली नसती, तर या परिसरातील अन्य इमारतींना धोका झाला असता. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे ५ तास प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.
फायर ऑडिट असूनही उपयोग नाही
शहरात आगीच्या घटना नवीन नाही.  ५-६ वर्षांपूर्वी शहरातील एका हॉटेलला आग लागून ११ जणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही फायर ऑडिट करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, ‘ए टू झेड महासेल’ असलेल्या इमारतीचे फायर ऑडिट झाले असूनही आगीचा भडका बघून कर्मचाऱ्यांना काहीच समजले नाही. 
अग्निशमन दलाचे जवानही जखमी 
आगीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नरत असलेले अग्निशमन दलातील डी.आर. तेलासे, मोहनीश नागदेवे, आमीर खान, शहबाज सय्यद, राहुल मेश्राम, लोकचंद भेंडारकर व छबीलाल पटले जखमी झाले. यातील कुणाचे हात  तर कुणाची पाठ व छातीही भाजल्याची माहिती आहे.

 

Web Title: ‘A to Z Mahasel’ burn in the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग