ग्रामसेवक, सरपंचसह तिघांना लाचखोरी भोवली; असा लावला सापळा
By कपिल केकत | Published: April 20, 2023 08:58 PM2023-04-20T20:58:45+5:302023-04-20T20:59:00+5:30
बिल काढून देण्यासाठी मागणी : कुडवा येथील व्दारिका हॉटेलमध्ये लावला सापळा
गोंदिया : रस्ता बांधकामासाठी टाकण्यात आलेल्या बांधकाम साहित्याचे बिल काढून देण्यासाठी ३५ हजार रूपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारणाऱ्या सरपंच पतीला लाच लुपचत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (दि.२०) केली असून प्रकरणी सरपंचपतीसह सरपंच व ग्रावसेविकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीती प्रशांत साखरे (३६,रा. चंद्रशेखर वॉर्ड, गोंदिया) असे ग्रामसेविका, अर्चना योगेश्वर कन्सरे (२८,रा. कोहका) असे सरपंच तर योगेश्वर भय्यालाल कन्सरे (३६,रा.कोहका) असे लाचखोर सरपंचपतीचे नाव आहे.
सविस्तर असे की, तक्रारदार हे बांधकाम मटेरियल सप्लायर असून त्यांनी गट ग्रामपंचायत सेजगाव खुर्द अंतर्गत प्राप्त टेंडर नुसार जन सुविधा योजने अंतर्गत सेजगाव स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचा बांधकामाकरिता लागणारे २,७१,८५७ रुपयांचे साहित्य पुरविले आहे. पुरवठा केलेल्या बांधकाम साहित्याची बिले मंजूर करून त्यांना धनादेश दिल्याचा मोबदला म्हणून आरोपी ग्रामसेविका प्रीती साखरे यांनी १३००० रूपये तर सरपंच अर्चना कन्सरे व त्यांचा पती योगेश्वर कन्सरे यांनी २२००० रुपयांची मागणी केली. यावर तक्रारादाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे पथकाने बुधवारी (दि.१९) पडताळणी केली असता ग्रामसेवक साखरे व सरपंच अर्चना कन्सरे यांनी ३५००० रुपये सरपंच योगेश्वर कन्सरे याच्याकडे देण्यास सांगीतले.
यावर पथकाने गुरूवारी (दि.२०) लगतच्या ग्राम कुडवा येथील द्वारिका हॉटेलमध्ये सापळा लावला व योगेश्वर कन्सरे याने पंचासमक्ष ३५००० रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कामगिरी पोलीस उप अधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पो.नि. तुल तवाडे, स.फौ. विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे,
पो. हवा. संजय बोहरे, मंगेश काहलकर, नापोशी संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, संगीता पटले, रोहिणी डांगे व चालक दीपक बतबर्वे यांनी पार पाडली.