सर्व्हिसिंगसाठी आलेल्या ट्रकला लागली आग, सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान
By कपिल केकत | Published: May 29, 2023 04:52 PM2023-05-29T16:52:02+5:302023-05-29T16:52:23+5:30
फुलचूर येथील घटना
गोंदिया : सर्व्हिसिंगसाठी आलेल्या उभ्या ट्रकला अचानक आग लागली. यामध्ये ट्रकचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. शहरालगत ग्राम फुलचूर येथील रजा सर्व्हिसिंग सेंटरमध्ये सोमवारी (दि. २९) रात्री १ वाजतादरम्यान ही घटना घडली.
सविस्तर असे की, आमगाव निवासी पप्पू अग्रवाल यांच्या मालकीचा दहाचाकी ट्रक क्रमांक एमएच ०४-ईएल ४०६० फुलचूर येथील साई मंदिराजवळ असलेल्या रजा सर्व्हिसिंग सेंटरमध्ये सर्व्हिसिंगसाठी आणल्याने उभा होता. सोमवारी (दि. २९) रात्री १ वाजतादरम्यान अचानक त्या ट्रकला आग लागली. अग्निशन विभागाला माहिती दिली असता अग्निशमन पथक लगेच घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग नियंत्रणात आणली. मात्र, ट्रकची केबिन व बोनट जळून सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. ट्रकला आग कशी काय लागली याचे नेमके कारण कळू शकले नाही. ही कारवाई इन्चार्ज मुकेश माने, चालक अशोक कांबळे, फायरमन आदित्य भाजीपाले, सचिन बाहेकर व अजय रहांगडाले यांनी पार पाडली.