भर कोर्टात न्यायाधीश व खासगी वकिलात शाब्दीक वाद; ठोठावला ५ दिवसांचा सश्रम कारावास
By अंकुश गुंडावार | Published: February 5, 2024 09:27 PM2024-02-05T21:27:19+5:302024-02-05T21:28:24+5:30
गोंदिया : एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश व खासगी वकील या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यामुळे न्यायाधीशांनी न्यायालय अवमानप्रकरणी खासगी ...
गोंदिया : एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश व खासगी वकील या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यामुळे न्यायाधीशांनी न्यायालय अवमानप्रकरणी खासगी वकिलाला ८० रुपये दंड किंवा दंड न भरल्यास ५ दिवसांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
ही घटना सोमवारी (दि. ५) फेब्रुवारी रोजी गोंदिया जिल्हा न्यायालयात दुपारी १२ वाजता घडली. ॲड. पराग तिवारी (५०, रा. मामा चौक, गोंदिया) असे शिक्षा झालेल्या खासगी वकिलाचे नाव आहे. ॲड. तिवारी यांनी दंड भरण्यास चक्क नकार दिला. त्यामुळे तिवारी यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, न्यायमूर्ती अभिजित कुलकर्णी यांच्या न्यायालयात एका जमिनीच्या प्रकरणाला घेऊन सोमवारी सुनावणी ठेवण्यात आली होती. दरम्यान, पक्षकाराचे वकील पराग तिवारी हे न्यायालयात थोडे उशिरा पोहोचले. यावरून न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी थेट पक्षकारालाच वकील बदलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ॲड. पराग तिवारी यांनी आक्षेप घेतला. दरम्यान, न्यायमूर्ती कुलकर्णी व ॲड. तिवारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. याप्रकरणी न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी न्यायालयीन अवमानप्रकरणी ॲड. तिवारी यांना ८० रुपयांचा दंड किंवा दंड न भरल्यास ५ दिवसांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र, ॲड. तिवारी यांनी दंड न भरण्याचा अट्टाहास धरून शिक्षेला स्वीकार केला.
यामुळे गोंदिया पोलिसांनी ॲड. तिवारी यांना ताब्यात घेऊन कारागृहात रवानगी केली. गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच वकिलाला शिक्षा सुनावल्याच्या घटनेची नोंद झाली.