मोबाइल टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न, तरुणाला पोलिसांनी वाचवले, लग्नासाठी नकार दिल्याने आले नैराश्य
By अंकुश गुंडावार | Published: November 22, 2023 08:19 PM2023-11-22T20:19:15+5:302023-11-22T20:19:41+5:30
ही घटना बुधवारी (दि.२२) देवरी तालुक्यातील खामखुरा येथे घडली. दिपक कुमार रेनसिंह सलामे (२४) रा. खामखुरा असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मजनुचे नाव आहे.
देवरी : प्रेम प्रकरणातून आलेल्या नैराश्यातून मोबाइल टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला चिचगड पोलिसांनी मोठ्या शिथाफीने व समजूत काढत टॉवरवरुन खाली उतरविले. ही घटना बुधवारी (दि.२२) देवरी तालुक्यातील खामखुरा येथे घडली. दिपक कुमार रेनसिंह सलामे (२४) रा. खामखुरा असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मजनुचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील खामखुरा येथील दिपककुमार सलामे याचे छत्तीसगड येथील एका तरुणीवर प्रेम जडले. त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्धार केला. दिपकने तरुणीला लग्नाची मागणी घातली. पण त्या तरूणीने दिपकसोबत लग्न करण्यास नकार दिला. या प्रकाराने दिपकला नैराश्य आले. याच नैराश्यातून बुधवारी (दि.२२) त्याने गावातील ३०० फूट उंच मोबाइल टाॅवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा प्रकार दिपकचे कुटुंबीय व गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती चिचगड पोलिसांना दिली.
माहिती मिळताच ठाणेदार शरद पाटील हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टॉवरवर चढलेल्या दिपकशी मोबाइलव्दारे संपर्क साधून त्याच्यासह संवाद साधून त्याची टॉवरवरुन खाली उतरण्यासाठी मनधरणी केली. तसेच त्याचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. सलग चार तास प्रयत्न केले. पण तो तरुण काही एक ऐकत नव्हता. ही बाब ठाणेदार शरद पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी दिपकचे प्राण वाचवायचे ठरवून त्याला सतत मोबाइलवर बोलण्यात व्यस्त ठेवले. त्याला स्वत:च्या जिवाचे बरे वाईट करायचे नाही असे सांगून त्यांनी त्याला विश्वासात घेतले. इतर आवश्यक असलेल्या वस्तू जागेवर त्वरित उपलब्ध करुन दिल्या. सामाजिक कार्यकर्ते, तसेच पोलिस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांच्या मदतीने त्या दिपकला चार तासांच्या प्रयत्नानंतर सुखरुप खाली उतरविले. दिपक टॉवरवरुन खाली उतरल्यानंतर त्याचे कुटुंबीय व गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पोलिसांनी काळजीपूर्वक हाताळले प्रकरण
ठाणेदार शरद पाटील यांनी दिपकची संपूर्ण माहिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी त्याच्याशी जवळपास अर्धा ते पाऊन तास मोबाइलवरुन संवाद साधून त्याचे समुपदेशन केले. तसेच त्याला विश्वास दिला. चार तास हा सर्व प्रकार चालला. यानंतर दिपक टॉवरवरुन खाली उतरला. चिचगड पोलिसांनी अतिशय काळजीपूर्वक ही घटना हाताळली.
प्रेम प्रकरणातून आले नैराश्य
दिपकचे छत्तीगड राज्यातील एका तरुणीवर प्रेम जळले होते. तिच्या प्रेमात तो आंधळा झाला होता. त्या तरुणीच्या प्रेमात तो अधिकच वाहत गेला होता. त्याने त्या तरुणीला लग्नाची मागणी घातली. पण त्या तरुणीने त्याला नकार दिला. याचा दिपकच्या मनावर गंभीर परिणाम होवून तो नैराश्यात गेला. याच नैराश्यातून त्याने मोबाइल टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलल्या जाते.