अबब...२७ हजार क्विंटल धान झाले गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:31 PM2018-01-22T22:31:11+5:302018-01-22T22:32:23+5:30
जिल्ह्यात सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात खरेदी केलेल्या एकूण धानापैकी तब्बल २६ हजार ७७६ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली नाही.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : जिल्ह्यात सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात खरेदी केलेल्या एकूण धानापैकी तब्बल २६ हजार ७७६ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली नाही. तर या धानाची नोंद राईस मिलर्स अथवा जिल्हा पुरवठा विभागाकडे नसल्याने कोट्यवधी रूपयाचे धान गेले कुठे? असा प्रश्न निर्माण झाला असून २७ हजार क्विंटल धान गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गोंदिया जिल्ह्याची ओळख धान्याचे कोठार म्हणून आहे. एकूण कृषी क्षेत्राच्या ८० टक्के क्षेत्रात धान पिकांची लागवड केली जाते. सन २०१६-१७ च्या हंगामात आधारभूत किंमत योजनेंतर्गत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय व आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून ५९ हजार ६३४ शेतकºयांकडून १९ लाख ३७ हजार ७८० क्विंटल ७० किलो धान खरेदी करण्यात आले होते. या धानाची किंमत २८४ कोटी ८५ लाख होती. या धानाच्या भरडाईची जबाबदारी ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची होती. त्यानुसार त्यांनी २०८ राईस मिलर्सला १९ लाख २३ हजार ३३१ क्विंटल धान भरडाईसाठी दिले. राईस मिलर्सने १९ लाख ११ हजार ३ क्विंटल धानाची भरडाई करु न १२ लाख ८० हजार ३७२ क्विंटल तांदूळ शासनाला जमा केला. जिल्हा पुरवठा अधिकाºयांच्या कार्यालयाच्या माहितीनुसार सध्यास्थितीत सन २०१६-१७ च्या आधारभूत धान खरेदी पैकी केवळ १५.९१ क्विंटल तांदूळ राईस मिलर्सकडे शिल्लक असल्याची नोंद आहे. परंतु या हंगामात झालेली एकूण खरेदी व त्यानंतर राईस मिलर्सला दिलेल्या धानाची आकडेवारी बघितल्यास खरेदी केलेल्या धानापेक्षा तब्बल १४ हजार ४६६ क्विंटल धान कमी असल्याचे आढळले. तर भरडाईकरिता दिलेला धान व भरडाई झालेला धान यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास तब्बल १२ हजार ३१०.७ क्विंटल धान कमी भरडाई झालयाचे उघडकीस आले. खरेदी केलेले आणि त्यानंतर भरडाईसाठी दिलेले व प्रत्यक्षात भरडाई झालेल्या धानाची आकडेवारीवर नजर टाकल्यास एकूण प्रत्यक्षात खरेदीच्या २६ हजार ७७६.७ क्विंटल धान कमी असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आहे.
ओल्या धानाच्या नावावर गोरखधंदा?
शेतकऱ्यांचे ओले धान मार्केटींग फेडरेशन किंवा आदिवासी विकास विभागाकडून घेतले जात नाही. थोड्याफार प्रमाणात धान ओले असेल तर तूट थोड्या प्रमाणात असू शकते परंतु २७ हजार किलो नव्हे तर क्विंटल धान्याची तूट दाखविणे म्हणजे इतरांना शुध्द मुर्ख बनविण्याचा तर धंदा सुरू नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांचे खरेदी केलेले धान कर्मचारी, अधिकारी यांच्या मार्फत परस्पर विक्रीला तर गेले नाही याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. धान खरेदी केल्यानंतर भरडाईसाठी देताना काही महिन्याचा कालावधी लागतो. या दरम्यान धान वाळत असल्याने वजनात कमतरता येवून तूट निर्माण होत असते. त्यामुळे प्रत्यक्षात झालेली खरेदी व भरडाईसाठी दिलेल्या धानात थोडा फरक राहणार आहे.
-ए.के. सवई, जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया.