आमगाव खुर्द पुन्हा येथे कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 09:59 PM2018-03-19T21:59:46+5:302018-03-19T21:59:46+5:30
आमगाव खुर्द ग्रामपंचायतचा सालेकसा नगर पंचायतमध्ये समावेश करण्यात यावा. या मागणीला घेवून मागील काही महिन्यापासून येथील नागरिकांचा लढा सुरू आहे.
आॅनलाईन लोकमत
सालेकसा : आमगाव खुर्द ग्रामपंचायतचा सालेकसा नगर पंचायतमध्ये समावेश करण्यात यावा. या मागणीला घेवून मागील काही महिन्यापासून येथील नागरिकांचा लढा सुरू आहे. मात्र शासन व प्रशासनाने अद्यापही गावकऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्याने आमगाव खुर्द वासीयांनी सोमवारी (दि.१९) आठवडी बाजाराच्या दिवशीच कडकडीत बंद पुकारला. याला सर्व व्यावसायीकांनी प्रतिसाद देत संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती.
ज्या गावाला सालेकसा म्हणून सर्वत्र ओळख आहे. ते गाव महसूल रेकार्डवर आमगाव खुर्दच्या नावाने आहे. येथील ग्रामपंचायत सुद्धा आमगाव खुर्दच्या नावावर आहे. परंतु सालेकसा तालुका मुख्यालयासह सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये आमगाव खुर्दच्या हद्दीत आहेत. सालेकसाच्या नावाने चालणारी संपूर्ण बाजारपेठ सुद्धा आमगाव खुर्द ग्रामपंचायतच्या परिसरात आहे. त्यामुळे तालुकास्थळ म्हणून आमगाव खुर्दच्या परिसरातच शहरीकरण झालेले आहे. अशात आमगाव खुर्दचे नगर पंचायतमध्ये रुपांतरण होणे आवश्यक होते. मात्र शहराबाहेर दुसºया महसूली गावांमध्ये सालेकसा नावाची ग्रामपंचायत चालत होती आणि या ग्रामपंचायतीत मूळ सालेकसा गाव सुद्धा असून इतर पाच गावाचा सुद्धा समावेश आहे. परंतु ही सर्व गावे मुख्यालयापासून दूर आहेत. मात्र शासनाने आमगाव खुर्दला वगळून सालेकसा ग्रामपंचायतला नगर पंचायतला दर्जा दिला. यामुळे आमगाव खुर्दवासीयांनी अनेक वेळा विनंती करुन आमगाव खुर्दला नगर पंचायतमध्ये समाविष्ठ करण्याची मागणी केली. यासाठी न्यायालयात सुध्दा धाव घेतली. विविध प्रकारचे आंदोलने, धरणे, उपोषणाचा मार्ग सुद्धा पत्करला परंतु शासनाने यावर कुठलाही निर्णय घेतला नाही. यामुळे आमगाव खुर्दचे नागरिक व्यथीत झाले. मागील आठ महिन्यात सोमवारी दुसऱ्यांदा येथे कडकडीत बंद ठेवण्यात आला.
बेमुदत उपोषण सुरुच
आमगाव खुर्दला नगर पंचायतमध्ये समाविष्ठ करण्यात यावे या मागणीला घेवून मागील २७ फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयासमोर आमगाव खुर्दवासीयांचे साखळी उपोषण सुरू आहे. शासनाला अनेकदा निवेदन सुद्धा देण्यात आले. मात्र यानंतरही उपोषणाची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. जोपर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहील. असा ईशारा आमगाव खुर्द वासीयांनी दिला आहे.
नोटीसच्या उत्तराची प्रतीक्षा
७ मार्चला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगर विकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवाला अवमानना नोटीस बजावून दोन आठवड्यात आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. ती मुदत आता संपत आली असून आमगाव खुर्दच्या समायोजनाबाबत नगर विकास मंत्रालय कोणती भूमिका घेईल याची सुद्धा वाट आहे. कायदेशिर पद्धतीने आपल्याला न्याय मिळेल याबाबत आमगाव खुर्दवासीयांना आशा आहे. २०१५ ला वासुदेव चुटे व ब्रजभूषण बैस यांनी जनहित याचिका दाखल केली होती.
आंदोलनाला सर्व पक्षीय समर्थन
आमगाव खुर्दच्या या आंदोलनात सर्वपक्षाचे कार्यकर्ते पक्षभेद बाजूला ठेवून एकत्रित आले आहेत. काँग्रेस, भाजप, रॉका, शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते धरणे, आंदोलन, बंद, उपोषण, मोर्चे, या कार्यक्रमात एकत्र येवून लढा देताना दिसत आहेत. दरम्यान स्थानिक आमदार आमगाव खुर्दवासीयांच्या मागणीचा विरोध करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र आमचा निर्णय ठाम असल्याचे सांगितले.