आमगाव ग्रामीण रूग्णालयाने ‘कात टाकली’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:08 AM2017-08-26T00:08:45+5:302017-08-26T00:09:14+5:30
उत्तम आरोग्य सेवा हे ब्रिद वाक्य असलेल्या सार्वजनिक आरोग्य अभियानाच्या उद्देशांत दोन वर्षापूर्वी सपशेल फेल ठरलेल्या आमगाव येथील ग्रामीण रूग्णालयाचे आता रूपच पालटले आहे.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उत्तम आरोग्य सेवा हे ब्रिद वाक्य असलेल्या सार्वजनिक आरोग्य अभियानाच्या उद्देशांत दोन वर्षापूर्वी सपशेल फेल ठरलेल्या आमगाव येथील ग्रामीण रूग्णालयाचे आता रूपच पालटले आहे. मागील दिड वर्षापासून येथे कार्यरत महिला डॉक्टर शोभना सिंह यांच्या प्रयत्नांचे फसलीत म्हणावे की, ज्या रूग्णालयात वर्षभरात फक्त ८ प्रसूती झाल्या होत्या, त्याच रूग्णालयात आता फक्त साडे चार महिन्यांत ७२ प्रसूती करण्याचा विक्रम नोंदविण्यात आला. यातून आमगावच्या ग्रामीण रूग्णालयाने ‘कात टाकली’ असे म्हणावे लागत आहे.
आमगाव येथील ग्रामीण रूग्णालय २००४ च्या सुमारास तयार करण्यात आले. या रूग्णालयात साधी आरोग्य सेवा मिळत नव्हती. रूग्णालयात सन २०११ पासून प्रसूतीच केली जात नव्हती. सन २०१४-१५ या पूर्ण वर्षात बाह्यरूग्ण विभागात ३१ हजार १९८ रूग्ण, आकस्मीक एक हजार ६५२ रूग्ण, आंतररूग्ण १ हजार २२७ तपासले गेले. उपचारासाठी दाखल झालेल्या २४३ रूग्णांनी रूग्णालयात उपचार न घेता डॉक्टरांनी मनाई केल्यावरही रूग्णालयातून पळ काढला. ५२ मृतदेहांची उत्तरीय तपासणी, ५८ किरकोळ शस्त्रक्रिया तर कुटुंब नियोजन किंवा हायड्रोसीलची एकही सर्जरी झाली नाही. विशेष म्हणजे वर्षभरात फक्त ८ प्रसूती करण्यात आल्या होत्या.
सन २०१५-१६ या संपूर्ण वर्षात बाह्यरूग्ण विभागात ३६ हजार ६५६ रूग्ण, आकस्मीक २ हजार ३१७ रूग्ण, १ हजार ५८ आंतररूग्ण तपासले गेले. उपचारासाठी दाखल झालेल्या २१८ रूग्णांनी रूग्णालयातून पळ काढला होता. ३१ मृतदेहांची उत्तरीय तपासणी, ३७ किरकोळ शस्त्रक्रिया व कुटुंब नियोजन किंवा हायड्रोसीलची एकही सर्जरी झाली नाही. शिवाय वर्षभरात फक्त ६ प्रसूती करण्यात आल्या होत्या.
सन २०१६-१७ मध्येही बाह्यरूग्ण विभागात ३६ हजार ४२० रूग्ण, आकस्मीक २ हजार ७७९ रूग्ण, १ हजार २३८ आंतररूग्ण तपासले. उपचारासाठी दाखल झालेल्या १७ रूग्णांनी पळ काढला होता. तर ५५ मृतदेहांची उत्तरीय तपासणी, १३४ किरकोळ शस्त्रक्रिया, १२ कुटुंब नियोजन व हायड्रोसील शस्त्रक्रीया, २९ प्रसूती, २२८ एक्सरे व १७ महिलांना तांबी बसविण्यात आली.
सन २०१७-१८ या वर्षातील साडे चार महिन्यांत बाह्यरूग्ण विभागात १३ हजार ५७९ रूग्ण, आकस्मीक एक हजार २४२ रूग्ण, आंतररूग्ण ६१८ रूग्ण तपासले. उपचारासाठी दाखल झालेले एकही रूग्ण उपचार न घेताच पळालेला नाही. २५ मृतदेहांची उत्तरीय तपासणी केली.
याशिवाय ९१ किरकोळ शस्त्रक्रिया, ३ कुटुंब नियोजन व हायड्रोसील शस्त्रक्रीया करण्यात आल्या असून साडे चार महिन्यांत ७२ प्रसूती करण्यात आल्या आहेत. त्यातील ५० महिलांना तांबी बसविण्यात आली. ११८ रूग्णांचे एक्सरे काढण्यात आले. विशेष म्हणजे, रूग्णालयात अचानक आग लागल्यास आगीवर नियंत्रण कसे आणायचे यासंदर्भात येथील कर्मचाºयांना प्रशिक्षणही देण्यात आले.
शोभनाने सुशोभित केले
या ग्रामीण रूग्णालयात ५ फेब्रुवारी २०१६ रोजी डॉ. शोभना सिंह रूजू झाल्या. त्यांच्याकडे मे महिन्यात या रूग्णालयाच्या अधिक्षकाचा प्रभार आला. त्यानंतर या रूग्णालयाचा कायापालट सुरू झाला. ज्या रूग्णालयात वर्षाकाठी सहा ते आठ महिलांच्या प्रसूती होत होत्या. त्याच रूग्णालयात साडे चार महिन्यांत ७२ प्रसूती करणे, त्यातच प्रसूती झालेल्या ५० महिलांना तांबी बसविण्याचे काम त्यांनी केले. कुटुंबनियोजन व हायड्रोसिलचे आॅपरेशन या रूग्णालयात होऊ लागले.
‘एक्स-रे’साठीची लुबाडणूक थांबली
एक्स-रेची सोय आमगाव ग्रामीण रूग्णालयात नव्हती. त्यामुळे येथील रूग्णांना खासगी क्लीनीकमधून एक्स-रे काढावे लागत होते. एक्स-रेसाठी रूग्णांची पिळवणूक व्हायची. परंतु डॉ. शोभना सिंह यांनी रूग्णांच्या सेवेसाठी एक्स-रे मशीन सुरू करवून घेतले. मोठ्या सर्जरी या ठिकाणी होत नव्हत्या, त्या करण्यास प्राधान्य दिले. मोडकळीस आलेले हे रूग्णालय अवघ्या दिड वर्षात वर्धनश्रेणीच्या स्पर्धेत आले. ‘स्वच्छ परिसर व उत्तम आरोग्य सेवा’ यामुळे हे रूग्णालय आता खासगी रूग्णालयातील सेवांना बाजूला सारत आहे.