अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 09:29 PM2017-09-01T21:29:34+5:302017-09-01T21:30:03+5:30
एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यात याव्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यात याव्या. गेल्या ३ ते ४ वर्षांपासूनचे थकीत असलेले प्रवास देयक देण्यात यावे, या मागणला घेऊन अंगणाडी सेविकांनी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच मागण्याचे निवेदन खंडविकास अधिकारी नारायण जमईवार यांना दिले.
संघटनेच्या अध्यक्ष सरिता मांडवकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पंचायत समिती कार्यालयासमोर झालेल्या मार्गदर्शन सभेत संघटनेच्या मांडवकर यांनी मोर्चासंबंधी खंडविकास अधिकाºयांसोबत चर्चा करण्यात आली. प्रवास देय भत्यासंबंधी प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी तसेच संघटनेच्या पदाधिकाºयांशी येत्या ६ तारखेला बैठक आयोजित करुन सदर प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सभेत सांगितले. प्रवास देयक महिनाभरात मिळाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चर्चेदरम्यान दिल्याचे सांगितले.
अंगणवाडी सेविकांचे मानधन जून महिन्यापासून आॅनलाईन सुरू झाले. ज्या सेविकांच्या खात्यावर १ रुपया जमा झाला नाही. मार्च ते मे महिन्यापर्यंतच्या मानधनापैकी काही अंशत:च रक्कम जमा झाली. उर्वरित रक्कम अद्याप खात्यावर जमा झाली नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मानधनासंबंधी कार्यालयात विचारणा केली असता बँक खात्यावर जमा होतील, असे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रकार सर्रास सुरु आहे. कार्यरत सेविका, मदतनिसांच्या खात्यावर मानधन जमा झालेच नाही, असा सावळा-गोंधळ कार्यालयात सुरू आहे. यावर वरिष्ठांचा धाक नसल्याचे त्यांच्या कामकाज प्रणालीवरुन दिसून येत असल्याचे संघटनेच्या सरिता मांडवकर यांनी सांगितले.
आदिवासी भागामध्ये अमृत आहार गरोदर माता व बालकांना दिला जातो. मागील मार्च महिन्यापासूनचा पैसा कार्यालयात उपलब्ध असून अंगणवाडी सेविकापर्यंत तो पोहचू शकला नाही. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना १० आॅगस्ट रोजी तक्रार केली असता संबंधित कार्यालयाला संपूर्ण पैसा वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठांच्या भेटीनंतर अर्जुनी मोरगाव येथील कार्यालयातून मार्च व एप्रिल अशा दोन महिन्यांचा अमृत आहाराचा पैसा संबंधितांच्या खात्यावर टाकण्यात आला. उर्वरित पैसा थांबवून ठेवण्यात आला. नियमितपणे निधीची पूर्तता होत नसल्यामुळे पुढील महिन्यापासून अमृत आहार अंगणवाडी सेविका देणार नाही, असे निवेदन देताना संबंधितांना कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शासनाने अंगणवाडी सेविकांच्या मागण्या त्वरीत मार्गी न लावल्यास या विरोधात आंदोलन छेडण्याचा संकल्प मोर्चात सहभागी सर्व अंगणवाडी सेविकांनी केला. त्यासंबंधीचे निवेदन देखील अधिकाºयांना दिले.
मोर्चामध्ये तालुक्यातील कार्यरत अंगणवाडी सेविका बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या. मोर्चासाठी सल्लागार डॉ. चंद्रशेखर मांडवकर, शोभा लेपसे, उर्मिला खोब्रागडे, कमल खुणे, कांता डोंगरवार, मंगला शहारे, विद्या धांडे, सत्याशिला मेश्राम, अनुसया कापगते आदींनी सहकार्य केले.
११ सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन
अंगणवाडी कर्मचाºयांना दर महिन्याला मानधन नाही. सरकार मानधनात वाढ करीत नाही. राज्य कृती समितीच्या शिष्टमंडळाला जून महिन्यापर्यंत मानधन वाढविला जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले. सेविका, मदतनिसांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास वारंवार चालढकल होत असल्याने मासिक प्रगती अहवाल शासनाला कळविला जाणार नाही, असे निर्णय झाल्याचे सांगून येत्या ११ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांचा बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा सरिता मांडवकर यांनी मोर्चाप्रसंगी झालेल्या सभेत सांगितले.