गुन्हेगारी प्रवृत्ती त्यागून गावात शांतता ठेवा

By admin | Published: September 11, 2014 11:37 PM2014-09-11T23:37:46+5:302014-09-11T23:37:46+5:30

गुन्हेगारीवर आळा घालून गावात शांतता प्रस्थापित व्हावी. सहयोगाच्या भावनेतून उत्सव पार पडावे. गावात दारूबंदी असावी, मोबाईलचा दुरूपयोग टाळावा व पालकांनी आपल्या पाल्यांवर देखरेख ठेवावी,

Abandon the criminal tendency and keep calm in the village | गुन्हेगारी प्रवृत्ती त्यागून गावात शांतता ठेवा

गुन्हेगारी प्रवृत्ती त्यागून गावात शांतता ठेवा

Next

काचेवानी : गुन्हेगारीवर आळा घालून गावात शांतता प्रस्थापित व्हावी. सहयोगाच्या भावनेतून उत्सव पार पडावे. गावात दारूबंदी असावी, मोबाईलचा दुरूपयोग टाळावा व पालकांनी आपल्या पाल्यांवर देखरेख ठेवावी, या बाबींची जाणीव गावकऱ्यांना व्हावी या हेतूने गंगाझरीचे ठाणेदार सुरेश कदम यांनी परिसरातील विविध ग्रामपंचायतींमध्ये सभेचे आयोजन करून जनजागृती मोहिमेची सुरूवात केली आहे.
या मोहिमेदरम्यान अनोळखी व्यक्तींवर अतिविश्वास ठेवू नये व त्यांना आपले ओळखपत्र देण्याचे टाळावे, असेही मार्गदर्शन केले जात आहे. आतापर्यंत ठाणेदार सुरेश कदम यांनी गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सेजगाव कला, बेरडीपार, डोंगरगाव, शहारवानी, कवलेवाडा, रापेवाडा आणि चुटिया या गावांत जनजागृती सभा घेतल्या. यानंतर उर्वरित गावात पुन्हा अशाच सभा घेवून जनजागृती करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
विघ्नहर्त्याच्या आगमनानंतर दिवाळीपर्यंत उत्सव सातत्याने चालणार आहेत. त्यावेळी शांतता भंग होण्याची भीती सर्वांना असते. उत्सवाप्रसंगी ठाणेदार सुरेश कदम यांनी गावागावात घेतलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात सर्वसामान्यांना व नवयुवकांना समजेल अशी मार्गदर्शक माहिती देत असल्याचे नागरिकांनी लोकमतला सांगितले आहे.
गंगाझरी ठाण्यांतर्गत येणाऱ्या बेरडीपार (काचेवानी) येथील ग्रामपंचायतमध्ये ठाणेदार कदम यांनी गावकऱ्यांची सभा घेतली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश ठाकरे होते. अतिथी म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हेमंत राऊत व सर्व सदस्य, उपसरपंच जीवन झगेकार, सुरेश झगेकार, पोलीस पाटील हंसराज कटरे, माजी सरपंच गणेश कोल्हटकर, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुखदेव बिसेन, माजी सरपंच भैयालाल जांभूळकर, उपसरपंच धनराज पटले, अलका चौधरी, कामन कटरे, राजू भोंडे व प्रकाश मेश्राम उपस्थित होते.
यावेळी आपल्या मार्गदर्शनात ठाणेदारांनी सांगितले की, उत्सवादरम्यान गावात शांतता ठेवावी. भाऊबंदाप्रमाणे सहकार्याने व प्रेमाने उत्सव साजरे करून गावाचे नाव तालुक्यात व जिल्ह्यात गाजेल, असे प्रयत्न करावे. गावातील सर्व नागरिक एकच आहेत, अशी भावना सर्वांनी बाळगावी. वाद होत असतील तर गावातील प्रतिष्ठितांच्या मार्गदर्शन व सल्ल्याने ‘गावातील वाद गावातच’ मिटविण्याचा प्रयत्न करावा. कोणतेही वाद पोलीस ठाण्यापर्यंत येवू देवू नका. अवैध व्यवसाय व नशेखोरी यातून गुन्हेगारी जन्माला येते. गुन्हेगारी व वादांमुळे स्वत:चा, कुटुंबाचा, गावाचा, तालुक्याचा व जिल्ह्याचा विकास खुंटतो. एवढेच नव्हे तर वादामुळे वादी व प्रतिवादी या दोघांना त्रास होतो व अकारण आर्थिक अडचन सहन करावी लागते. यासाठी गावातील अवैध धंदे थांबविण्यासाठी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.
पोलीस ठाणे व कर्मचारी जनतेच्या संरक्षणासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी आहेत. परंतु जनतेच्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही. नागरिक पोलीस ठाण्यात येतात, तेव्हा वेळ बिघडलेली व प्रकरण चिरघडले असते. त्यामुळे अशी समस्या निर्माण होण्यापूर्वीच सावधगिरी ठेवावी, असा नागरिकांना त्यांनी सल्ला दिला.
यावेळी सभेत ३०० पेक्षा अधिक महिला व पुरूष उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Abandon the criminal tendency and keep calm in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.