अबब...! रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:33 AM2021-08-21T04:33:15+5:302021-08-21T04:33:15+5:30
लोहारा : राष्ट्रीय महामार्ग म्हटले की डोळ्यासमोर चकाकणारे रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा विजेचे खांब व दुभाजक असे चित्र डोळ्यांसमोर ...
लोहारा : राष्ट्रीय महामार्ग म्हटले की डोळ्यासमोर चकाकणारे रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा विजेचे खांब व दुभाजक असे चित्र डोळ्यांसमोर येते. मात्र देवरी ते आमगाव या नवीन राष्ट्रीय महामार्ग या संकल्पनेला पूर्णपणे अपवाद ठरत आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ५ वर्षांपूर्वी जिल्ह्याला २ नवीन राष्ट्रीय महामार्गाची भेट दिली. जिल्ह्याच्या मुख्यालयी भव्य समारंभात या महामार्गाचे भूमिपूजनदेखील केले. राष्ट्रीय महामार्ग २ वर्षांत पूर्ण होईल, असा शब्ददेखील त्यांनी दिला होता. देवरी-आमगाव या मार्गाचे कंत्राट पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले. सुरुवातीला बांधकाम अत्यंत जोमाने करण्यात आले. काही ठिकाणी पर्यावरणाच्या परवानगीमुळे बांधकामाला मंद गती आली. मात्र सध्या देवरी-आमगाव दरम्यान असलेल्या वडेगाव येथे अर्धा किलोमीटर परिसरात खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा हे समजेनासे झाले आहे. या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी नेहमीच या मार्गाने ये-जा करतात. मात्र त्यांना या रस्त्याची दुर्दशा दिसत नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
------------------
वाहन चालविताना तारेवरची कसरत
उन्हाळ्यात नागरिकांनी कसाबसा या मार्गावरून प्रवास केला. मात्र आता पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकी चालक सुरक्षितरित्या घरी पोहोचेल की नाही याचीदेखील खात्री नसते.
---------------
कोट : रात्रीच्या वेळेस या महामार्गावरील प्रवास म्हणजे जिवाशी खेळ ठरतोय. वडेगाव येथील रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा गावकऱ्यांच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल.
-अंजू बिसेन, सरपंच, वडेगाव