अबब... आजपासून नवतपा लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:32 AM2021-05-25T04:32:47+5:302021-05-25T04:32:47+5:30
गोंदिया : वर्षभरात सर्वाधिक तापणाऱ्या ९ दिवसांना नवतपा म्हटले जात असून मंगळवारपासून (दि.२५) हा नवतपा लागत आहे. आता सर्वाधिक ...
गोंदिया : वर्षभरात सर्वाधिक तापणाऱ्या ९ दिवसांना नवतपा म्हटले जात असून मंगळवारपासून (दि.२५) हा नवतपा लागत आहे. आता सर्वाधिक तापणारे दिवस म्हटल्यानेच जिवाला धडकी भरत असून घाम फुटू लागतो. मात्र, यंदाचा नवतपा तापवणारा नव्हे तर सामान्य वातावरणातच निघून जाणारा दिसत आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याने या नवतपात ढगाळ वातावरण व पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
उन्हाळा म्हटले की, घामाच्या धारा सुटत असून धडकीच भरते. कडक उन्हात घराबाहेर पडणे जीवघेणेच ठरत असून कामकरी लोकांना मात्र कामासाठी बाहेर पडावेच लागते. अशात उन्हाळा लवकर संपावा अशीच कामना सर्व करतात. विशेष म्हणजे, मे महिन्यातील उन्ह अंगाला भाजून सोडणारे असते व त्यातच नवतपा येतो. नवतपा म्हणजे सर्वाधिक तापणारे ९ दिवस. या ९ दिवसांत सूर्यदेव सर्वाधिक आग ओकतो, असे बोलले जाते व यामुळेच नवतपा ऐकताच धडकी भरते.
मात्र, यंदाचा नवतपा तापवणारा न राहता सामान्य वातावरणातच निघून जाणार असे दिसत असून हवामान खातेही असाच अंदाज व्यक्त करीत आहे. यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच ढगाळ वातावरण व पावसाने हजेरी लावल्याने चांगलाच दिलासा मिळाला. ढगाळ वातावरणामुळे आतापर्यंत जिल्ह्याचे तापमान ४० डिग्रीच्या आतच नोंदले जात आहे. त्यात आता नवतपातील पुढच्या दिवसांत काही दिवस ढगाळ वातावरण व त्यातच पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच, नवतपा आता असाच निघून जाणारा दिसतो. त्यानंतर ७ जूनपासून मान्सून येणार असल्याने नवतपा थंडगार निघून जावा, अशी कामना सर्वच करीत आहेत.
--------------------------
जिल्ह्याचे तापमान ३९.८ डिग्री
यंदा उन्हाळा सरत आला असून मे-हीटमध्येही जिल्ह्याचे तापमान ४० डिग्रीच्या आतच नोंदले जात आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी ४० डिग्री पार करून तापमान जात असल्याने घराबाहेर निघणेही कठीण होते. मात्र, यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासून ढगाळ वातावरण व पावसामुळे तापमान ४० डिग्रीच्या आतच आहे. सोमवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३९.८ तर किमान २६.५ एवढे नोंदण्यात आले आहे.